Fake Baba Case Baramati Pudhari
पुणे

Fake Baba Case Baramati: भोंदूबाबाला ४ वर्षांची सक्तमजुरी; बारामती न्यायालयाचा मोठा निर्णय

जादूटोण्याच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार, फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बारामती: पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत महिलांवर लैंगिक अत्याचार करत जादूटोण्याच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्या मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. धोपवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) या भोंदूला येथील जिल्हा न्यायाशिध एस. आर. पाटील यांनी जादूटोणा कायद्याअंतर्गत चार वर्षे सक्तमजुरीची व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

दि. १५ ऑगस्ट २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत बारामती, महाबळेश्वर आणि साताऱ्यात ही घटना घडली होती. या प्रकरणी बारामतीत राहणाऱ्या एका महिलेने तालुका पोलिस ठाण्यात जाधव याच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी त्याच्या विरोधात शारिरिक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

जाधव याने पैशाचा पाऊस पाडायचा असून त्यासाठी पुजा करावी लागेल असे सांगत या महिलेला महाबळेश्वर येथे बोलावून घेत पूजा केली. दुसरी पूजा करण्यासाठी नग्न अवस्थेत डोळे झाकून पुजेला बसावे लागेल असे सांगितले. तुमच्याशी शरीर संबंध केल्याशिवाय पैसे येणार नाहीत असे सांगत फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले होते.

दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी ऑगस्ट फिर्यादीकडून १४ हजार तर तिच्या एक मैत्रिणीकडून ५० हजार रुपये घेतले होते. तिच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. या प्रकरणात जादूटोण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली गेली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी करत आरोपीविरुद्ध बारामती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. अॅड. शिंगाडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधिश पाटील यांनी भारतीय न्याय संहिता ३१८ (४) नुसार जाधव याला दोषी ठरवत २ वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड तर जादूटोणा कायद्यान्वये ४ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला या खटल्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गोरख कसपटे, सहाय्यक उपनिरीक्षक अभिमन्यू कवडे, हवालदार रेणूका पवार, न्यायालय लिपिक सुनिता कांबळे यांचे सहकार्य मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT