Courier Fraud Pudhari
पुणे

Baramati Courier Fraud: बारामतीत कुरिअर कंपनीत ४.७१ लाखांचा अपहार; डिलिव्हरी टीम लीडरविरोधात गुन्हा दाखल

ग्राहकांकडून पार्सलचे पैसे ऑनलाइन व रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप; कंपनीच्या खात्यात रक्कम जमा न करता वैयक्तिक वापरासाठी ठेवल्याचे तपासात उघड

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात कार्यरत असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी टीम लीडरने डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून ग्राहकांकडून जमा होणारी रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल ४ लाख ७१ हजार ७६० रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप असून, बारामती शहर पोलिस ठाण्यात किरण सुखदेव निरफळ (रा. माळवाडी-विजयनगर, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी शुभम तुकाराम भिसागर (वय ३०, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे डिलिव्हरी लिमिटेड कंपनीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे बारामती विभागाची जबाबदारी आहे. कंपनीच्या बारामती येथील प्रगतीनगर कार्यालयात किरण निरफळ हे २०२० पासून टीम लीडर म्हणून काम पाहत होते. त्यांच्या अधिपत्याखाली अन्य १० कामगार कार्यरत होते. ग्राहकांना ऑनलाइन पार्सल पोहोचविल्यानंतर मिळणारी रक्कम कंपनीच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर होती.

दरम्यान, ३१ डिसेंबर २०२५ रोजी कार्यालयातील ऑनलाइन पार्सलचे ऑडिट करण्यात आले. त्यानंतर ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत काही पार्सलचे पैसे कंपनीच्या खात्यात जमा नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित ग्राहकांशी संपर्क साधला असता, पार्सल मिळाले असून, त्याचे पैसे ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना दिल्याचे ग्राहकांनी सांगितले.

त्यानंतर कंपनीने अंतर्गत चौकशी केली असता, किरण निरफळ यांच्या सांगण्यावरून डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून मिळणारी रक्कम स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाइन स्वरूपात घेत असल्याचे समोर आले. कार्यालयातील कर्मचारी हनुमंत भोईटे व लक्ष्मण पोमण यांनी रोख स्वरूपात जमा झालेली रक्कम घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

चौकशीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांनी ही रक्कम किरण निरफळ यांच्याकडे जमा केल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने वारंवार पैशांची मागणी करूनही संबंधित रक्कम जमा करण्यात आली नसल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. ग्राहकांना पार्सल वितरित करून त्याचे पैसे कंपनीकडे जमा न करता वैयक्तिक वापरासाठी ठेवत ४ लाख ७१ हजार ७६० रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT