Cotton Pudhari
पुणे

Baramati Cotton Cultivation: बारामतीच्या ऊसपट्ट्यात ‘पांढरे सोने’ फुलले; या कारणामुळे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

baramati agriculture: यंदा ३७४ हेक्टरवर कपाशीची लागवड; काटेवाडी मंडळ २६७ हेक्टरसह आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

Baramati Agriculture News Cotton Farming

काटेवाडी: उसाचे आगार असलेल्या बारामती तालुक्यात पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांची कपाशीला पसंती वाढत चालली आहे. तालुक्यात यंदा तब्बल ३७४ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. काटेवाडी मंडळातच २६७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याने ऊसपट्ट्यात ‘पांढरे सोने’ पुन्हा फुलू लागल्याचे चित्र आहे.

कापसाला मिळणारा दर, तुलनेने कमी कालावधीतील उत्पादन, योग्य बाजारभाव आणि नदीकाठच्या क्षारपड जमिनीच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा कापसाकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोनगाव, गीतेवस्ती, मेखळी परिसरात कापूस लागवडीचे क्षेत्र विशेषत्वाने वाढले आहे. कापसाला मिळणारा बाजारभाव आणि जास्त उत्पादन यामुळे काही शेतकरी या नगदी पिकाकडे वळत आहेत.

काटेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव, उंडवडी सुपे, शिर्सुफळ, मोरगाव आदी मंडळांत कमी-अधिक प्रमाणात कापूस लागवड झाली आहे. काटेवाडी मंडळ २६७ हेक्टर क्षेत्रासह आघाडीवर आहे. सोनगाव-गीतेवस्ती परिसरात कापसाचे पीक सध्या बहरात आले आहे. बारामतीच्या जिरायती भागात पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत सातत्याने बदल करावे लागत आहेत. मोरगाव, सुपे, लोणी भापकर परिसरात कांदा, सोयाबीन, कडधान्यांसह विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाची स्थिती समाधानकारक नसल्याने काही भागांत चारापिकांसह कमी कालावधीतील पिकांकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

बारामतीतील प्रमुख खरीप पिकांची सद्यस्थिती

  • बाजरी ७,४८०

  • मका ४,७२०

  • कांदा १,२५१

  • गळीत धान्य १,५९७

  • कापूस ३७४

  • तूर ४६१

  • मूग २१६

मागील वर्षी एक एकर क्षेत्रातून १८ क्विंटल कापूस उत्पादन घेतले. त्यावेळी कापसाला प्रतिक्विंटल सुमारे ८ हजार ५०० रुपये दर मिळाला सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. त्यामुळे यंदा तब्बल १२ एकर क्षेत्रावर कापूस लागवड केली आहे. परिसरातील अनेक शेतकरी पुन्हा कापूस लागवडीकडे वळत आहेत.
संदेश गीते, कापूस उत्पादक शेतकरी सोनगाव, गीतेवस्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT