बारामती: बारामतीला इंदूरच्या धर्तीवर विकसित केले जाणार असून चाकण, बारामती आणि लोणावळा ही तीन शहरे इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्याच्या अनेक भागात अजूनही अतिवृष्टी होत आहे. रेड अलर्ट राहण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये पावसाने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. (Latest Pune News)
मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसह सोलापूरमध्येही पावसाने कहर केला आहे. निसर्गाची अवकृपा झाल्यावर काय होते, ते आपण पाहिले आहे. त्यामुळे मदतकार्य तातडीने सुरू आहे. पाच ट्रक साड्या-परकर आणि आवश्यक साहित्य पाठवण्याचं नियोजन केलं आहे.
यासह, मी सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो. काल-परवा तर जेवायलाही वेळ मिळाला नाही. कामाच्या बाबतीत माझा हात कुणी धरू शकत नाही. मी कामाचा माणूस आहे, असेही पवार या वेळी म्हणाले.
विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी
बारामती शहरात शारदा प्रांगणात अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी इंग््राजी सीबीएसई शाळा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी 17 कोटी 50 लाखांचा निधी दिला आहे. उर्दू शाळा इमारतीसाठी सात कोटींचा निधी देण्यात आला आहे. गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा आमचा हेतू आहे.
तिरंगा सर्कल ते पेन्सिल चौक या दरम्यानच्या राहिलेल्या कामासाठी अतिरिक्त पाच कोटी रुपये दिले आहे.सिल्व्हर ज्युबिलीशेजारी महावितरणची जुनी इमारत काढून तेथे नवीन इमारत बांधली जाणार आहे.जळोची अग्निशमन केंद्रासाठी दोन कोटींचा निधी दिला आहे. विविध कामांसाठी 25 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एमआयडीसी परिसरात 78 कोटींचे स्टेडियम मंजूर करण्यात आले आहे.
ही तर दोडकी बहीण
बारामतीत पावसाचे पाणी जाण्यासाठी काही ठिकाणी जाळ्या बसवल्या आहेत. त्यातून पाणी जाण्यासाठी वेळ लागतो. परंतु काही जण लगेच त्याचे व्हिडिओ काढून बारामती तुंबल्याचे दाखवतात. काही लोक आमच्या लाडक्या बहिणींना गाडी घेऊन तेथे उभे करून व्हिडिओ काढतात. असे व्हिडिओ काढणाऱ्यांनो, जरा लाजा वाटू द्या, आम्ही आमची बहीण लाडकी... लाडकी म्हणतो पण तीसुद्धा दोडकीसारखी वागतेय, असे पवार म्हणाले.
माझ्या विचारांचेच लोक निवडून द्या
मी कामाचा माणूस आहे, बिनकामाचा नाही. पुढे निवडणुका आहेत. काही जण फिरायला लागले आहेत, इकडे लक्ष दिले का त्यांनी ? जर विकास थांबवायचा नसेल, तर माझ्या विचारांचे लोक निवडून द्यावे लागतील, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.