harshvardhan sapkal Pudhari
पुणे

Baramati Bypoll: बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसचा उमेदवार माघारी; सपकाळांचा राजकीय हल्लाबोल

2029 मध्ये विजयाचा दावा; भाजप-राष्ट्रवादीवर जोरदार टीका

पुढारी वृत्तसेवा

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर आम्ही उमेदवार दिला होता. परंतु झालेली विनंती लक्षात घेत सदसदविवेक बुद्धीतून अर्ज माघारी घेतला. २०२९ ला मात्र बारामतीत आमचाच उमेदवार बारामतीत विजयी होईल असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. १०) बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱयांसह बारामतीतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बारामतीतील घडामोडीबाबत बोलताना ते म्हणाले, मित्रपक्ष लढत नसल्याने आम्ही इथे लढण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक कार्यकत्यांची तशी मागणी होती. जिल्हा काॅंग्रेस कमिटीने तसा ठराव करत प्रदेश पातळीवर पाठवला. आम्ही मुलाखती घेत केंद्र स्तरावर पाठवून मंजूरी घेत अर्ज दाखल केला. परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मला चारदा फोन आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन केला. आमदार रोहित पवार भेटीला आले. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनीही फोन केला, ना.मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले. त्यानंतर सदसदविवेक बुद्धीनुसार निर्णय घेतला. यात कुठेही गेम फिरला असा कार्यकारण भाव नाही. वैचिराक विरोध आहेच पण झालेल्या विनंतीतून हा निर्णय घेतला. पण राष्ट्रवादीचे दिल्लीत वजन असणाऱया खासदारांनी मला किंवा आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना संपर्क केलेला नाही असेही त्यांनी तटकरे यांचे नाव न घेता ते म्हणाले. श्रद्धांजली, सहानुभुतीच्या अनुषंगाने संस्कृती व सभ्यतेतून अर्ज मागे घेतला. पण कोणाला मतदान करा हे बारामतीकरांना सांगणार नाही, त्यांनी सदसदविवेक बुद्धीने मतदान करावे असे सपकाळ म्हणाले.

अजितदादांच्या अपघाताची राज्यात चौकशी होईना

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या विनंतीच्या अनुषंगाने आमदार रोहित पवार भेटले. त्यांच्या भेटीत अपघातासंबंधी व त्या अनुषंगाने दाखल एफआयआरवर चर्चा झाली. कर्नाटकात हा एफआयआर काॅंग्रेसच्या सत्तेमुळे नोंदला गेला. खा. राहूल गांधी यांनी त्यात हस्तक्षेप केल्याने नोंद झाली. राज्यातच हा एफआयआर दाखल होवून चौकशी व्हावी अशी आमची मागणी होती. परंतु राज्य सरकारने त्यात टाळाटाळ केली. आता झिरो नंबरने एफआयआर आपल्याकडे आल्यावरही चौकशी होत नाही. त्या अनुषंगाने मी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी चर्चा केली. आमदार पवार, काॅंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मुख्यमंत्री विजयकुमार सिंग तेथे भेटले. तेथील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचीही भेट झाली. महाराष्ट्रात या घटनेचा तपास केला जात नाही, आपल्याकडे गुन्हा नोंद झाला आहे, त्यामुळे कर्नाटकच्या स्तरावरच चौकशी व्हावी व सोक्षमोक्ष लागावा अशी मागणी आम्ही त्या सरकारकडे केली आहे अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

अर्ज माघारीसाठी इतके फोन आले यातच 'डाऊनफाॅल'

खा. पार्थ पवार यांनी काॅग्रेसवर केलेल्या टीकेचा सपकाळ यांनी समाचार घेतला. अर्ज माघारीसाठी ज्या पक्षाला एवढे फोन करावे लागले ते 'डाऊन' आहे. अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघात झाल्यावर साधी चौकशी होत नाही यात 'डाऊनफाॅल' दिसतो आहे. विखारी भाजपसोबत त्यांना राहावे लागतेय तिथे 'डाऊनफाॅल' दिसतोय या शब्दात त्यांनी प्रतिहल्ला केला.

भाजप हा खोकला पक्ष

सपकाळ यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला केला. भाजप हा खोकला पक्ष आहे. त्या पक्षाकडे विचार नाही, नितीमत्ता नाही. ५६ इंच छातीच्या लोकांचे आता काही खरे राहिले नाही. शतप्रतिशतच्या नाऱयातही आता दम नाही. देवाभाऊ.. देवाभाऊ करून नेता सक्षम असल्याचे सांगता मग दुसऱयांचे पक्ष का फोडता, असा सवाल त्यांनी केला. भाजप व मित्रपक्षांना चेटकिणीसारखा आजार लागला आहे. चेटकिन जशी मुले खाते तसे हे इतर पक्षातील लोक खातात अशा शब्दात सपकाळ यांनी भाजपवर हल्ला केला.

नाशिक प्रकरणाची चौकशी व्हावी

नाशिकमध्ये एका कंपनीत घडलेल्या प्रकारामध्ये धर्मांतर व त्या अनुषंगाने असलेल्या कायद्यानुसार कारवाई व्हावी पण राजकारण होवू नये. गोमांस खायला घातल्याचा मुद्दा समोर येत आहे. त्याची चौकशी व्हावी. पण त्यांचेच आसामचे मुख्यमंत्री गोमांस बाहेर नको तर घरात खा म्हणतात, गोव्यात त्यांचे सरकार असताना गोमांसावर बंदी का नाही, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गोमांस निर्यात किती टक्क्याने वाढली याचेही उत्तर भाजपने दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

'जेम्सबाॅण्ड' म्हणत महाजनांवर टीका

भाजपचे 'जेम्सबाॅण्ड' मंत्री गिरिष महाजन यांनी खरात प्रकरणात चुप्पी साधली आहे. खरातचा विषय रेंगाळत ठेवण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे. परंतु आता नाशिकमध्ये गोमांसाचा विषय चघळला जात आहे. भाजपकडून जाती-धर्माचे राजकारण केले जात आहे. अंधश्रद्धेचा कायदा हिंदू धर्मावर घाला असल्याचे सांगितले जाते. मग भोंदूबाबाचे प्रकऱण आल्यावर भाजप तशी भूमिका का घेत नाही असा सवाल त्यांनी केला.

पडळकर स्टार प्रचारक हे आश्चर्य

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आमदार गोपिचंद पडळकर हे स्टार प्रचारक आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त करू की काय करू हा गहन प्रश्न आहे असे सांगून सपकाळ म्हणाले, अजून काय काय होते ते बघा. सोयीनुसार रंग बदलणे, जनतेहा गृहीत धरून फडवणीस राजकारणाचा खेळ खेळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT