बारामतीच्या जिरायती भागातील केळी आखाती देशात Pudhari
पुणे

Success Story: बारामतीच्या जिरायती भागातील केळी आखाती देशात

सातव कुटुंबीयांचा अवर्षणग्रस्त भागाला दिशा देणारा प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

बारामती: उसासाठी प्रसिद्ध असलेल्या बारामती तालुक्यातील शेतकरी आता केळीसारख्या नगदी पिकाकडेही वळत आहेत. परंतु, बारामतीच्या सातव कुटुंबीयांनी तालुक्याच्या जिरायती भागात निर्यातक्षम केळी लागवड प्रयोग यशस्वी केला. यातून त्यांनी शेतकर्‍यांना शेतीची वेगळी वाट दाखवली आहे. त्यांच्या शेतातील केळीची आता आखाती देशात निर्यात सुरू झाली आहे.

23 महिन्यांत केळी पिकांची दोन उत्पादने घेणे शक्य असल्याने ऊसशेतीच्या तुलनेने केळीकडे कल वाढण्याचे संकेत आहेत. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, त्यांचे थोरले पुत्र आणि बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, तसेच त्यांचे धाकटे पुत्र आणि माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी ही किमया साधली आहे. (Latest Pune News)

सातव कुटुंबाची तालुक्यातील कोळोळी येथे शेती आहे. गतवर्षी गौरी आगमनाच्या दिवशी त्यांनी तेथे पाच एकर क्षेत्रावर केळी लागवड केली होती. यामध्ये एकरी 1250 केळीच्या झाडांची 7 बाय 5 अंतरावर लागवड करण्यात आली. त्यांनतर निर्यातक्षम केळी उत्पादन घेता यावे यासाठी त्यांनी प्रयोगशील शेतकर्‍यांच्या शेतात जात मार्गदर्शन घेतले. ठिबक सिंचनाचा वापर करत खत व्यवस्थापन साधले.

सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये केळी पिकामुळे झालेली क्रांती बघून प्रेरणा मिळाली. शेतात आम्ही सुरवातीला पपई, जांभुळसह विविध फळपिकांच्या लागवडीचे यशस्वी प्रयोग केले. आज आमच्या केळीची निर्यात झाल्यानंतर आई- वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे मनापासून समाधान आहे, अशी भावना सचिन सातव यांनी व्यक्त केली.

क्रॉप रोटेशन म्हणून केळी हा चांगला पर्याय बारामती तालुक्यामध्ये ऊस लागण, खोडवा व त्यानंतर क्रॉप रोटेशन म्हणून केळी हा चांगला पर्याय पुढे येत आहे. केळी पीक घेतल्यानंतर जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीने सुधारतो. परिणामी, त्यामध्ये घेतलेल्या ऊसपिकाचे उत्पन्न चांगले येत आहे.

पणदरेपासून सुरू झालेली केळी शेती ही आता निरावागजसह दुष्काळी पट्ट्यामध्ये जळगाव सुपे परिसरातसुद्धा पोहचली आहे. दिवसेंदिवस केळीचे क्षेत्र वाढत असल्याचे सचिन सातव यांनी सांगितले. पाणी व्यवस्थापन केल्यास जिरायती भागात देखील केळीसारखे नगदी पीक लागवड करणे शक्य असल्याचे सातव म्हणाले.

शेतातून रविवारी (दि. 10) पहिल्यांदा केळी बारामतीपासून इराणला निर्यात झाली. सातव कुटुंबीयांनी तीन पिढ्या शेतीमध्ये केलेल्या कष्टाचे फळ मिळाले. या ऊर्जेतून अनेक शेतकर्‍यांना प्रोत्साहन देऊन आधुनिक शाश्वत शेती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस , फळबागा व इतर पिकांच्या आधुनिक शेतीमध्ये बारामती पॅटर्न पुढील काळात देशामध्ये नावलौकिक कमवेल.
- सचिन सातव, अध्यक्ष, बारामती सहकारी बँक/केळी उत्पादक बागायतदार
बारामती तालुक्यात केळी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनुदान तत्त्वावर केळी लागवड सुरू आहे. त्यासाठी आपण अर्ज स्वीकारत आहोत. जवळपास 250 हेक्टर केळी लागवडीसाठी अर्ज आलेले आहेत. केळी पिकासाठी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याची सोय करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना आहे. शेतकर्‍यांनी या योजनांचा लाभ घ्यावा.
- सचिन हाके, बारामती तालुका कृषी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT