

आळेफाटा: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजता गाजरपट येथे एका घराच्या ओट्यावरून जाणारा बिबट्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला.
काकडपट्टा आणि गाजरपट परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. सायंकाळनंतर ग्रामस्थांना बाहेर पडणे धोकादायक वाटू लागले आहे. बुधवारी रात्री मनोहर गाजरे यांच्या घरासमोरून बिबट्या जात असल्याचे कुटुंबीयांनी पाहताच एकच घबराट उडाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्याचा संचार स्पष्टपणे दिसून आला. (Latest Pune News)
स्थानिक युवक सचिन काकडे, सौरभ गाजरे, यश काकडे, सुनील काकडे, सचिन शिंदे व संजय गाजरे यांनी सांगितले की, या भागात किमान दोन ते तीन बिबटे फिरत आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंपळवंडी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून, गाजरपट येथेही पिंजरा बसवण्यात आल्याची माहिती आळे वनपरिक्षेत्राचे वनपाल अनिल सोनवणे यांनी दिली.