Baramati Election Pudhari
पुणे

Baramati Election: बारामतीत अजित पवारांचा विश्वास सचिन सातवांवर; नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार माघारीनंतर चित्र स्पष्ट; तिरंगी मुकाबल्याची चिन्हे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

बारामती : बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याची कमालीची उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना संधी दिली आहे. बारामती नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासह 41 सदस्यांच्या जागा आहेत. येथील निवडणूक तिरंगी होणार, हेही आता स्पष्ट झाले आहे.

बारामतीच्या नगराध्यक्षपदाची धुरा अजित पवार कोणाकडे देणार? याची चर्चा निवडणूक जाहीर झाल्यापासून रंगली होती. राष्ट्रवादीकडून आपणाला उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक उमेदवारांनी शक्ती पणाला लावली होती. अखेर या स्पर्धेत सचिन सातव यांनी बाजी मारली आहे. त्यांनी अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सातव यांनी यापूर्वी बारामती नगरपरिषदेचे गटनेते म्हणून काम पाहिले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.

भाजपने नगराध्यक्षपदासह एकूण 31 जागी उमेदवार उभे केले आहेत. भाजपकडून येथे नगराध्यक्षपदासाठी ॲड. गोविंद देवकाते हे रिंगणात उतरले आहेत. भाजपने ओबीसी चेहऱ्याला संधी दिली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने जिल्हाध्?क्ष सुरेंद्र जेवरे यांनीही नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले असून, नगरसेवकपदासाठीही आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. आम्ही एकत्रित बसून चर्चा करून तिघांपैकी एकाचे नाव अंतिम करू, अशी माहिती या पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनी दिली. वंचित बहुजन आघाडी, कॉंग््रेास आणि शिवसेना (उबाठा) व अन्य समविचारींना आम्ही सोबत घेणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. बसपच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी काळुराम चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, भाजप-शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रीय समाज पक्ष हे आघाडी करून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी माघारी घेण्याच्या दिवशीच यासंबंधीचे अधिक चित्र स्पष्ट होईल. बसपने ‌’एकला चलो रे‌’ अशी भूमिका घेतली आहे. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष समविचारींना सोबत घेत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बेरजेचे राजकारण

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण केल्याचे त्यांच्या उमेदवार यादीवरून दिसून आले. गतवेळी त्यांच्या पॅनेलविरोधात निवडून आलेल्या माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, जयसिंग देशमुख यांना राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून संधी देण्यात आली आहे. तर, माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, अभिजित जाधव, अमर धुमाळ, संजय संघवी, बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ या मागील टर्ममधील नगरसेवकांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत तिसरी पिढी

बारामती नगरपरिषदेसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सदाशिव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सचिन सातव यांचे आजोबा धोंडीबा आबाजी सातव यांनी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले होते. सचिन सातव यांच्या आई जयश्री व वडील सदाशिव धोंडीबा सातव हे दोघेही नगराध्यक्ष राहिले आहेत. आता तिसऱ्या पिढीला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT