पुणे: घुसखोरी करून भारतात आलेल्या बेकायदा वास्तव्य करणार्या दोन बांगलादेशी तरुणींंना गुन्हे शाखेच्या पथकाने कात्रजमधील सुखसागरनगर परिसरातून ताब्यात घेतले. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
बेकायदा वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आल्यानंतर आतापर्यंत आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बांगलादेशी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
मुसम्मद सोनी अब्दुल समद, मोनीरा बेगम (वय 19, दोघी मूळ रा. गुजिया, जि. बोगारा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. बेकायदा वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलिस कर्मचारी अमोल घावटे, प्रफुल्ल मोरे यांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलिस कर्मचारी राजेंद्र नलावडे, कानिफनाथ कारखेले, अमोल घावटे, गणेश थोरात, प्रफुल्ल मोरे, भरत गुंडवाड, गणेश माने, सर्जेराव सरगर, शिवाजी सातपुते, शीतल जमदाडे, नेहा तापकीर यांनी ही कारवाई केली.