मोहसीन शेख
बाणेर: औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडून ९० टक्के पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परिसरातील ओढे, नाले, ड्रेनेज लाईन आणि पावसाळी वाहिन्यांच्या साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सहायक आयुक्तांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या काळातील अनुभव पाहाता पाऊस सुरू झाल्यावरच प्रशासनाच्या दाव्यातील सत्यता समोर येणार असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, सुस आणि म्हाळुंगे या भागांत नालेसफाईसह ९० टक्के पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचे सहायक आयुक्त विजय नायकल यांनी सांगितले. मात्र, दर वर्षी ही कामे केवळ कागदावर पूर्ण झाल्याचे दाखवली जात असल्याने पहिल्याच पावसात प्रशासनाच्या दाव्यांतील फोलपणा उघडा पडत आहे.
पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबून परिसरात पूरस्थिती निर्माण होत आहे. रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसानही होत आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि सुतारवाडी परिसरातील ओढे आणि नाल्यांची स्थिती अतिक्रमांमुळे गंभीर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी ओढे आणि नाल्यांचे प्रवाह बुजवण्यात आले आहेत. यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांची धाकधुक कायम आहे. प्रशासनाने नाल्यांच्या परिसरातील अतिक्रमणे हाटवून त्यांचे प्रवाह मोकळे करण्याची मागणी होत आहे.
या ठिकाणी तुंबते पावसाचे पाणी
बाणेर मुख्य रस्ता, आयडीबीआय बँकेसमोर.
सुतारवाडी स्मशानभूमी सुस रोड, सुतारवाडी लिंक रस्त्यावरील ओढ्याजवळ
सुस रोडवरील बालाजी चौक
बाणेर बिटवाईस चौकात
बालेवाडी प्रथमेश पार्क, शिवनेरी पार्क
औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जवळपास 90 टक्के पावसाळापूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी मशिनरी जात नसल्यामुळे मनुष्यबळाच्या साहाय्याने साफसफाईची कामे सुरू आहेत. या आठवड्यात ती पूर्ण होतील. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.विजय नायकल, सहायक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय