बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाला मारले, तो मलाही मारणार! Pudhari
पुणे

Bandu Andekar Gang: बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाला मारले, तो मलाही मारणार!

मृत्यूपूर्वी रिक्षाचालक गणेश काळेने व्यक्त केली होती भीती; खून होणार असल्याचे मित्राने सांगितले होते

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकर याने स्वतःच्या नातवाला मारले, तो मलाही मारणार, अशी भीती गणेश काळे यांनी खून होण्यापूर्वी आपल्या वडिलांकडे व आईकडे व्यक्त केली होती. त्यांच्या या भीतीत तथ्य असल्याचेच या खुनावरून सिद्ध झाले आहे. तशी तक्रारच त्याच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात दिली आहे. आंदेकर टोळी कारागृहात असतानाही बाहेर टोळी अजून ॲक्टिव्ह असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)

या खुनामागे जुन्या वैमनस्यातून आंदेकर खुनात गणेश याचा भाऊ समीर याचा सहभाग असल्यानेच हा बदला घेतला गेल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगितले जात आहे. शनिवारी दि. 01 सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास खडीमशीन चौकाजवळील भारत पेट्रोल पंपाजवळ हल्लेखोरांनी अतिशय थंड डोक्याने गणेश काळे यांना गाठले. मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी आधी धारदार शस्त्रांनी गणेश याच्यावर प्राणघातक वार केले आणि त्यानंतर सोबत आणलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याचा क्रूरपणे खून केला.

खून होण्याची खबर मिळाली; मात्र तो स्वतःला वाचवू शकला नाही

खुनाचा गुन्हा घडण्यापूर्वी दोन ते तीन दिवसांपासून गणेश जास्तच अस्वस्थ दिसल्याने त्याच्या वडिलांनी त्याला विचारणा केली होती, तेव्हा त्याने वडिलांना सांगितले होते की, अमीर खान, स्वराज वाडेकर हे गणपती, शिवजयंतीकरिता अमन शेख, अरबाज पटेल, समर्थ दुधभाते, समर्थ माडळकर या चौघांना वर्गणी देत असतात. त्यामुळे ते चौघे अमीर खान, स्वराज वाडेकर व त्यांचा साथीदार मयूर वाघमारे या सर्वांच्या उपकाराखाली आहेत. त्यामुळे हे चौघे कृष्णा आंदेकर, बंडू आंदेकर, अमीर खान, मयूर वाघमारे व स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून माझा खून करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती एका मित्राने दिली. त्यानंतर थेट गणेशचा खून झाल्याची खबरच त्याच्या वडिलांना मिळाली.

सावधगिरी बाळगण्याचा केला होता काळे कुटुंबीयांनी निश्चय

गणेश काळे याने आपला पाठलाग होण्याची भीती व्यक्त केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आपण सर्वच जण सावधगिरी बाळगू असे ठरवले होते. त्याचे वडील त्याला रोज फोन करून व घरी आल्यावर त्याच्याकडे चौकशी करत होते, परंतु पाठलाग थांबला नसल्याचेही त्याने पुन्हा सांगितले होते.

गणेश काळेचा होत होता पाठलाग

गणेशोत्सव काळात व मागील 10 ते 15 दिवसांपासून गणेश हा अस्वस्थ असल्याचे त्याच्या वडिलांना जाणवले होते. याबाबत त्यांनी गणेशच्या आईला सांगितले होते. मागील आठवड्यात रिक्षा चालवून घरी आल्यावर एकत्रीत जेवण करत असताना दोघांनी गणेशला त्याबाबत विचारणा केली होती. गणेश काळे हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशतीखाली होते. वनराजच्या टोळीतील लोक सूड घेतील, अशी भीती गणेश याला सतावत होती. आपल्या पत्नी आणि आई-वडिलांना ही भीती व्यक्त करताना गणेश याने एक अत्यंत धक्कादायक विधान करताना ‌‘बंडू आंदेकर याने तर स्वतःच्या नातवालाही सोडले नाही, मग तो मला कशाला सोडेल?‌’ त्यामुळे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून, वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा खून घडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारागृहातून डाव साधल्याची चर्चा

पोलिसांनी विविध पद्धतीने शहरातील टोळ्यांचे कंबरडे मोडण्याची मालिका सुरू केली असताना आंदेकर टोळी कारागृहात असतानाही ॲक्टिव्ह असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कारागृहात राहूनही त्यांनी आपली दहशत अजूनही कायमच ठेवली आहे. त्यामुळे शहरात वाढत्या संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT