पुणे : नाना पेठेतील जमिनीचा ताबा बळजबरीने घेऊन त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून पाच कोटी ४० लाख रुपये खंडणी स्वरूपात उकळल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरला समर्थ पोलिसांनी अटक केली.
नातू आयुष कोमकरच्या खून प्रकरणात धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंडूला न्यायालयाच्या प्रॉडक्शन वॉरंटद्वारे समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला सोमवारी दुपारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी, न्यायालयाने त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
ही घटना २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली. जमिनीच्या विकासनासाठी बेकायदा ताबा सोडण्याची विनंती करणाऱ्या जागामालकाकडे बंडू आंदेकरने दोन दुकाने अथवा दीड कोटी रुपये आणि महापालिकेच्या कामासाठी तीस लाख रुपये खंडणी मागितली; तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी भवानी पेठेतील एका व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) आणि मनेष ऊर्फ मनोज चंद्रकांत वर्देकर (वय ५६, रा. कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) या दोघांविरोधात खंडणी उकळणे, अतिक्रमण करणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले असता, बंडू आंदेकरने भाडेस्वरुपात लाटलेल्या पाच कोटी चाळीस लाख रुपये खंडणीचा काय विनियोग केला, या रकमेचे आणखी कोण लाभार्थी आहेत, अशा प्रकारे दहशतीच्या आधारे आरोपींनी इतर लोकांकडून खंडणी उकळली आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केली. आरोपीतर्फे ॲड. मिथून चव्हाण यांनी बाजू मांडली.