पुणे

वेल्हे : पहिल्याच पावसात बालवड पूल बुडाला

अमृता चौगुले

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी (दि.9) सायंकाळी पडलेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व पावसामुळे आलेल्या पुरात पासली ते भुतोंडेमार्गे राजगड -भोर रस्त्यावरील बालवड (ता.वेल्हे) येथील दुर्घटनाग्रस्त पूल बुडाला. त्यामुळे वेल्हे तसेच भोर तालुक्यातील वीस गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे.

ओढ्यावरील पूल कमी उंचीचा आहे. पुलाला संरक्षक कठडेही नाहीत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली बुडून वाहतूक ठप्प पडते. दोन वर्षांपूर्वी एक शेतकरी पुलावरून वाहत जाऊन मृत्युमुखी पडला. तसेच जनावरेही वाहून गेली आहेत. प्रशस्त पूल उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने बालवड तसेच शेनवड येथील धोकादायक पुलांची कामे रखडली आहेत. राजगड, तोरणागड तसेच मढे घाट परिसरात येणार्‍या पर्यटकांसह स्थानिक शेतकरी, विद्यार्थ्यांची वाहतूक या रस्त्यावर सुरू आहे.

पुणे तसेच राजगड, भोरकडे जवळच्या अंतराने जाता येत असल्याने या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. शुक्रवारी दुपारी चारपासून सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस पडला. ओढ्याला मोठा पूर आला. झाडेझुडपे, गवत दगड माती वाहून पुलाच्या मोरीत अडकून पूल बुडाला. रस्त्यावरून वेगाने पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पूरही ओसरला.

अचानक मोठा पाऊस झाल्याने थोड्या वेळात ओढ्याला पूर आला. पुलावरून वेगाने पाणी वाहू लागले. त्यावेळी पायी जाणारे नागरिक प्रसंगावधान दाखवत बाजूला धावत गेल्याने जीवितहानी टळली, असे खोपडेवाडी (ता.वेल्हे) येथील शेतकरी प्रकाश जोरकर म्हणाले.
पुलाचे काम प्रस्तावित आहे, मात्र अद्यापही निधी मंजूर झाला नाही.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी बालवड व पुलाला लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याचे काम तातडीने सुरू करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय संकपाळ यांनी सांगितले. वेल्हे व भोर तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील मुख्य रस्ता असल्याने दुर्घटनाग्रस्त बालवड व इतर पुलांची कामे करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी भाजपचे माजी जि.प. सदस्य आनंद देशमाने यांनी केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT