रेशनकार्डधारकांना आता घरपोच धान्य | पुढारी

रेशनकार्डधारकांना आता घरपोच धान्य

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : रेशन दुकाने चालविण्यात व्यावसायिक इच्छुक नसल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आता धान्य घरपोच दिले जाणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 27 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही धान्यसेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभाग वाहने खरेदी करणार आहे.

काही वर्षांपूर्वी शिधावाटप दुकानातून ग्राहकांना गहू, तांदूळ, चणाडाळ, गोडेतेल, साखर आणि रॉकेल सवलतीच्या दरात विक्री केली जात होते. शिधापत्रिकाधारकांच्या तुलनेने बिगर शिधापत्रिकाधारकांची संख्या अधिक होती. त्यामुळे रेशन दुकानांमधून काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू होता. विशेषतः रॉकेलची मागणी अधिक होती. काळ्या बाजारात रॉकेलची विक्री करून दुकानदार गब्बर झाले होते.

रेशन घेऊन जाणारी वाहने दुकानांऐवजी परस्पर अन्य ठिकाणी वळवली जाऊ लागली होती. राज्य सरकारने अशा वाहनांना ट्रॅकिंग सिस्टीम लावल्यामुळे या प्रकाराला आळा बसला आहे.

अलीकडच्या काही वर्षांत रेशन दुकानांमधून चणाडाळ, साखर, गोडेतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तू गायब झाल्या आहेत. आता केवळ गहू आणि तांदूळ उपलब्ध आहे. रेशन दुकान आणि खासगी दुकानातील धान्यांच्या किमतीमध्ये फारशी तफावत नसल्यामुळे आता लोक रेशन दुकानाकडे वळत नाहीत.

तसेच केंद्र सरकारने रॉकेल विक्रीवर बंदी आणल्याने काळ्या बाजारातून मिळणारी रेशन दुकानदारांची कमाई बंद झाली आहे.

* शहरी आणि ग्रामीण भागात लोकसंख्या वाढली आहे. नागरिकरण झपाट्याने होत असल्यामुळे दुकानांसाठी जागा उपलब्ध होत नाही, तर भाड्याने दुकाने घेणे परवडत नसल्यामुळे धान्यवाटप केंद्रे चालविण्यात व्यावसायिक इच्छुक नाहीत. वारंवार जाहिराती देऊनही नवीन दुकाने चालविण्यासाठी कोणी पुढे येत नाही.त्यामुळे शिधावाटप दुकाने नसलेल्या ठिकाणी अन्न व नागरी पुरवठा विभाग घरपोच धान्यसेवा सुरू करणार आहे.

Back to top button