पुणे : शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात रसिक, कलाकार आणि नाट्यसंस्थांसाठी उपलब्ध असलेले पार्किंग हॉटेल व्यवसायिकांनी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हॉटेलचा कर्मचारी, “आम्ही पार्किंग विकत घेतले आहे” असा उद्धट दावा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेला जाग आली असून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. (Pune Latest News)
बालगंधर्व रंगमंदिर शहरातील प्रसिद्ध सांस्कृतिक सभागृह आहे. पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या या सभागृहात नाटके, लावणी, संगीतासह असंख्य सांस्कृतिक कार्यक्रम नियमित होतात. तसेच राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमुळेही हे सभागृह नेहमी भरलेले असते. कार्यक्रमासाठी शेकडो नागरिक, कलाकार आणि नाट्यसंस्थांच्या येथे येत असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र दुचाकी व चारचाकी पार्किंगची सोय येथे करण्यात आली आहे.
गेल्या चार–पाच वर्षांपासून हे पार्किंग मोफत होते. परंतु काही महिन्यांपूर्वी महापालिकेने एका बांधकाम व्यावसायिकास ठेका देऊन सशुल्क पार्किंगची व्यवस्था केली. मात्र, ही सुविधा केवळ बालगंधर्वमधील प्रेक्षक व कलाकारांसाठी असावी, अशी अपेक्षा असताना पार्किंगमध्ये घोले रस्त्यावरील एका हॉटेलच्या ग्राहकांची वाहने लावली जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळी नागरिक, कलाकार, तसेच नाट्यसंस्थांना जागा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
व्हिडिओत हॉटेलचा कर्मचारी कार पार्किंगसंदर्भात विचारणा करणाऱ्या नागरिकांना, “हे आमचे पार्किंग आहे, आम्ही विकत घेतले आहे, पुरावा हवा असेल तर हॉटेलवर या,” असे सांगताना दिसतो. याच वेळी एका नाटकाच्या गाडीला पार्किंग रिकामे करण्यास सांगितल्याची तक्रारही समोर आली आहे.
महापालिकेचे सांस्कृतिक विभाग उपायुक्त सुनील बल्लाळ यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले, “बालगंधर्व रंगमंदिराचे पार्किंग काही महिन्यांपूर्वीच ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. हॉटेलचे पार्किंग असल्याचे समोर आले आहे. याबाबत ठेकेदारास नोटीस बजावली आहे. समाधानकारक खुलासा न केल्यास ठेका रद्द करण्यात येईल.”
दरम्यान, पार्किंग परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे दुचाकी पार्किंगच्या रस्त्यातून नागरिकांना निसरड्या कठड्यावरून कसरत करत जावे लागते. या समस्येकडेही ठेकेदार व नाट्यगृह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.