बालेवाडीतील वेलोड्रम येणार ‘ट्रॅक’वर; क्रीडा विभागाकडून काम सुरू Pudhari
पुणे

Balewadi Velodrome: बालेवाडीतील वेलोड्रम येणार ‘ट्रॅक’वर; क्रीडा विभागाकडून काम सुरू

पुढील आठवड्यात प्रश्न मार्गी लागणार

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: राज्यातील एकमेव असलेला ‘वेलोड्रम म्हणजे अंडाकृती सायकल ट्रॅक’ कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. मात्र, या विषयाला क्रीडा विभागाकडून मार्गी लावण्याचे काम सुरू झाले आहे.

क्रीडा अधिकारी आणि सायकल संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये प्राथमिक बैठक झाली असून, वेलोड्रम ट्रक हा वुडन करायचा की सिमेंट काँक्रीटचा बनवायचा, यावर चर्चा सुरू आहे. आगामी काही दिवसांत हा निर्णय होऊन कामाला सुरुवात होणार असल्याचे क्रीडा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.(Latest Pune News)

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलातील वेलोड्रमचा पृष्ठभाग काँक्रीटचा बनलेला असून, ट्रॅकची लांबी 1,093.6 फूट आहे. 1994 च्या भारतीय राष्ट्रीय खेळांसाठी वेलोड्रम हे एक प्रमुख ठिकाण होते. परंतु, त्यानंतर कधीही कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांसाठी ते ठिकाण वापरात नव्हते. 2008 च्या श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलात झालेल्या राष्ट्रकुल युवा खेळांमध्ये सायकलिंगचे कोणतेही कार्यक्रम झाले नसल्याने या खेळांदरम्यान वेलोड्रमचा वापर स्पर्धास्थळ म्हणून करण्यात आला नाही.

2014 मध्ये असे जाहीर करण्यात आले की, संपूर्ण श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलासाठी सरकारकडून 10 कोटी रुपयांच्या देखभाल अनुदानासह वेलोड्रमच्या फेसलिफ्टला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. त्या वेळी वेलोड्रम जीर्णावस्थेत होता. एमटीबी आणि रोड इव्हेंटसाठीच्या प्रशिक्षणासाठी जास्त पायाभूत सुविधांची आवश्यकता नाही.

परंतु, ट्रॅक इव्हेंटसाठी वेलोड्रममध्ये प्रशिक्षण घ्यावे लागते आणि महाराष्ट्रात सध्या फक्त एकच वेलोड्रम आहे, जे बालेवाडीमध्ये आहे. सध्या वेलोड्रमचा वुडन ट्रॅक बनविणार्‍या जर्मनीस्थित कंपनीशी चर्चा सुरू आहे. या कंपनीचे अधिकारी बालेवाडी येथे भेट देणार असून, वातावरणाचाही अभ्यास करणार आहेत. तूर्तास या ट्रॅकसाठी 35 कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च अपेक्षित असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

बालेवाडी येथील वेलोड्रमबाबत क्रीडा विभागाच्या अधिकार्‍यांनी भारतीय सायकल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतलेली आहे. जर्मनीस्थित कंपनीकडून वुडनचा सायकल ट्रॅकचा पर्याय उपलब्ध करून पुन्हा एकदा अधिकार्‍यांसमवेत बैठक होऊन अर्थमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, आता लवकरच याबाबत आशादायी निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
- संजय साठे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलातील वेलोड्रमच्या दुरुस्तीबाबत काही दिवसांपूर्वी सायकल संघटनेचे पदाधिकारी आणि आयुक्तांसह अधिकार्‍यांची बैठक पार पडलेली आहे. आपल्या येथे असलेल्या हवामानाचा अंदाज घेऊन वुडनचा ट्रॅक किंवा सिमेंटचा ट्रॅक, याबाबत चाचपणी सुरू आहे. साधारणतः 35 कोटी रुपयांचा अंदाजे खर्च असून, पुढील आठवड्यात पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये निर्णय होईल.
- माणिक पाटील, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT