पुणे : कोथरूड व शिवाजीनगर भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा या नियोजित मार्गाचा आराखडा तयार करून बरीच वर्षे लोटली आहेत. त्यामुळे हा रस्ता तयार करताना सध्याच्या गरजा लक्षात घेतल्या जाणार असून, त्यानुसार पुन्हा नव्याने विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच, हा आराखडा तयार करताना रस्ता, उन्नत रस्ता (उड्डाणपूल) आणि बोगदा अशा विविध पर्यायांचा विचार केला जाणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. या मार्गासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पर्यावरणीय परवानगी घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे देखील राम यांनी सांगितले. सुरुवातीला आराखडा तयार केला, तेव्हा प्रकल्पाचा खर्च हा 32 कोटी होता. मात्र, हा खर्च आता 300 कोटींवर पोहचला आहे.(Latest Pune News)
बालभारती ते पौड फाटा हा मार्ग या मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करून बराचसा कालावधी गेला आहे. प्रकल्पाचा खर्च 32 कोटींवरून 300 कोटींवर गेला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करून सद्यःस्थितीनुसार नव्याने प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात इतर प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी पुढील अंदाजपत्रकातच तरतूद करता येणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
शिवाजीनगर व कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बालभारती ते पौड फाटा यादरम्यान रस्ता तयार करण्यात येणार होता. मात्र, येथील वनसंपत्तीमुळे हा मार्ग तयार करण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीश भूषण गवई आणि विनोद चंद्र यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या रस्त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे बराच विलंब झाला असून, प्रकल्पाचा खर्च देखील काही पटींनी वाढला आहे. तसेच, शिवाजीनगर व कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याचा युक्तिवाद महापालिकेने न्यायालयात केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महापालिकेने हा रस्ता तयार करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी आणि त्यानंतर काम करावे, असे आदेश दिले होते.
यासंदर्भात माहिती देताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, मशहरातील कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, या तीन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौड रोड, या मार्गाचे नियोजन केले आहे. या मार्गाची चर्चा मागील 25 ते 30 वर्षांपासून सुरू आहे. हा मार्ग हनुमान टेकडी आणि एआरएआय टेकडीच्या भागातून जाणार असून, येथे जमिनीखाली भूजलक्षेत्राचे प्रमाण अधिक आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असल्याने पर्यावरण प्रेमींकडून त्यास विरोध होत आहे. या विरोधामुळे हा मार्ग तयार करण्यास विलंब झाला आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च देखील काही पटीत वाढला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, आम्ही पर्यावरणीय परवानगीची प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहोत. या मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करून बराचसा कालावधी उलटल्याने या प्रकल्पाचा खर्च 32 कोटींवरून 300 कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यासाठी निधी देणे शक्य नाही. या रस्त्यासाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करून सध्याच्या गरजांनुसार नव्याने प्रकल्प आराखडा तयार केला जाईल. या आर्थिक वर्षात इतर प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.
शहरात सध्या मोठे प्रकल्प करणे शक्य नाही. त्यासाठी पालिकेकडे अपेक्षित निधी नाही. त्यामुळे बोगदे किंवा इतर मोठे प्रकल्प करण्याऐवजी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रमुख्याने बॉटलनेक मोकळे करण्यास प्राधान्य राहील, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.