गणेश खळदकर
पुणे: सध्याच्या काळात इंग्रजी या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे केवळ इंग्रजी शब्दांची तोंडओळख न होता विद्यार्थ्यांचा इंग्रजी ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या चारही कौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने बालभारतीच्या माय इंग्लिश बुक या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्धिक क्षमता चांगली असलेली मुले दुसरीतच फाडफाड इंग्रजी बोलतील, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा नवीन पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात ही नवीन पुस्तके पडणार आहेत. दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकाची विभागणी एकूण चार युनिटमध्ये केली आहे. यातील एका युनिटमध्ये 11 धड्यांचा समावेश असून, यामध्ये कथा, कविता, चित्रकथा आदींचा समावेश आहे.
पुस्तकात फक्त प्रश्नोत्तरे न देता निरीक्षण, चर्चा आणि स्वतःची मते मांडण्यास प्रोत्साहन दिले आहे. लहान मुलांना आवडेल अशी चित्रे व दृश्याधारित शिक्षणपद्धती वापरली आहेत. चित्र पाहून बोलणे, जोड्या लावणे, गाणी, खेळ, संवाद, भूमिकानाट्य यांचा समावेश आहे. अ फिस्ट इन द फॉरेस्ट या पाठात जंगलातील प्राणी एकत्र येऊन मेजवानी साजरी करतात अशी कथा आहे. या कथेच्या माध्यमातून मुलांना प्राणी नावे, अन्नपदार्थांची नावे आणि साधी इंग्रजी वाक्ये शिकवण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. ए जॉयफूल ट्रीप या पाठात नीतूच्या आजोबाने तिला एक खेळण्याचे विमान भेट दिलेले असते. नीतूला ते विमान खूप आवडते आणि ती नेहमी त्याच्यासोबत खेळत असते. एका रात्री तिला स्वप्न पडते की ते विमान तिच्याशी बोलते आणि तिला शहरावरून फिरायला घेऊन जाते. प्रवासात ती रेल्वे, बोट, झेब्रा क्रॉसिंग आणि ट्रॅफिक सिग्नल पाहते. तिचा मित्र अमर देखील या आनंददायी प्रवासात सहभागी होतो. शेवटी नीतूची झोप मोडते आणि तिला कळते की तो एक सुंदर स्वप्नवत प्रवास होता. या पाठातून मुलांना विविध वाहतूक साधनांची ओळख (विमान, रेल्वे, बोट इ.), वाहतूक नियमांचे प्राथमिक ज्ञान (झेब्रा क्रॉसिंग, ट्रॅफिक सिग्नल), कल्पनाशक्ती आणि स्वप्नांच्या जगाची मजा आदींबाबत माहिती देण्यात आली आहे.
नंबर सॉन्ग, इट्स रेनिंग, ट्रींग ट्रींग, इंडिया आदी कविता तसेच धडे शिकवताना वर्गात धमाल येणार आहे. म्युझिक स्टोअर या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बासरी, गिटार, तबला, पखवाज, वीणा, टाळ, पिपाणी, पियानो आदी वाद्यांच्या संदर्भात माहिती देऊन त्या वाद्यांचे कार्य आणि ओळख स्पष्ट करण्यात येणार आहे. यासह अन्य पाठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेती, व्यापार, हॉस्पीटल, निसर्ग, प्राणी, पालेभाज्या, वार्षिक कॅलेंडर, घड्याळ आदींची ओळख करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इयत्ता इंग्रजीचे दुसरीचे पुस्तक विविध अंगांनी परिपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तक झेपणार का?
शहरातील शिक्षणाचे महत्त्व पटलेले आई-वडील त्यांच्या मुलांचा पहिलीच्या अगोदर केजी, सीनिअर केजी, नर्सरी आदी इयत्तांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे त्यांचा पाया काही प्रमाणात पक्का होतो. याउलट ग्रामीण भागातील मुलांचे प्रवेश एक तर थेट पहिलीत होतात किंवा झालेच, तर अंगणवाडीत होतात. त्याठिकाणी त्यांना शिकवणारे शिक्षक नसतात. यामुळे त्यांचा पाया कच्चा राहतो. अशा परिस्थितीत थेट दुसरीच्या वर्गातच विद्यार्थ्यांना इंग्रजी फाडफाड बोलायला येणारी रचना करणे हे शक्य नाही, असे मत पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.