

पुणे: राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण ३ हजार ७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.
कृषी विद्यापीठाच्या आकृतिबंधाबाबत वर्ष २००३ नंतर म्हणजेच २३ वर्षांनी नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यापीठांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, संशोधन व अध्यापनाच्या गुणवत्तेत वाढ होईल, असे नमूद करून ते म्हणाले, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कृषी व पदुम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, नियमित ३ हजार ६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी ११२ पदे अशा एकूण ३ हजार ७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
शासन निर्णयानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठात १ हजार २१७ पदे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ५८९ पदे , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ८९० पदे आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ९१५ नियमित पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे 112 पदे भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू असून, त्यासंदर्भातील आदेश नंतर जारी करण्यात येतील. कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षमतेत वाढ, संशोधनाला चालना आणि विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.