Balbharati Class 2 Maths Book Pudhari
पुणे

Balbharati Class 2 Maths Book: बालभारतीच्या दुसरीच्या गणित पुस्तकात अर्थसाक्षरतेवर भर

सापशिडी, कोडी आणि बालमेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण; खेळातून शिकवण्यावर विशेष भर

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: गणित म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात, तर काहींना अक्षरश: घाम फुटतो; परंतु गणिताच्या पुस्तकाची रचनाच अशी करण्यात आली आहे की सापशिडी, गणितीय कोडे, बालमेळाव्यातून विद्यार्थ्यांना अर्थसाक्षर करण्याबरोबरच त्यांचे टेन्शनदेखील दूर केले आहे. त्यामुळे दुसरीच्या मुलांना हसत-खेळत अर्थसाक्षर करण्याकडे 'बालभारती'चा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात 'बालभारती'च्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना यंदा देण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात ही नवीन पुस्तके पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात साधारण २२ प्रकरणे देण्यात आली आहेत.

यामध्ये लहान मोठ्या संख्या, एकक, दशक यांची ओळख, चढता-उतरता क्रम, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, भौमितिक आकार या महत्त्वा‍च्या गणितीय संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना समजावत असताना त्यांना आर्थिक व्यवहारांची देखील तोंडओळख व्हावी यासाठी पैसे, नोटा आणि त्यांचे व्यवहारदेखील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहेत. त्यासाठी पाढे पाठ करून घेत असतानाच विविध वस्तूंचे गटाद्वारे मापन, वस्तूंची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यांची ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी वर्षाचे, मराठी वर्षाचे महिने, ऋतुचक्र, वार्षिक कॅलेंडरची ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे.

बालमे‍ळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनीच विविध वस्तूंची विक्री करायची आणि विद्यार्थ्यांनीच त्या वस्तू खरेदी करायच्या. यातून विद्यार्थ्यांना अर्थसाक्षर करण्यात येणार आहे. त्यासाठी नाणी आणि नोटांची देखील ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यासाठीच विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास करताना पांरपरिक पद्धतीने पाठांतर करण्याऐवजी कृतीयुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गणिताच्या पुस्तकात या आहेत किरकोळ चुका

इंग्रजी माध्यमाच्या दुसरीच्या गणित पाठ्यपुस्तकातील पान क्र. १७ वर मधल्या भागात २५, २३, १३ या तीन संख्या चौकटीत दिल्या आहेत. यातील लहानात लहान संख्या १३ दिली आहे, तर मोठ्यात मोठी संख्या ३४ दिली आहे. ही संख्या २५ असणे अपेक्षित आहे. त्याच पानावर २६, १४, १५ या तीन संख्या दिलेल्या आहेत. तेथे देखील लहानात लहान संख्या १३ दिली आहे. परंतु, त्याठिकाणी १४ ही संख्या देणे गरजेचे आहे. मराठी माध्यमाच्या पुस्तकात मात्र संख्या बरोबर दर्शविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात एक समान चूक आहे. पान क्र. ८५ वर जानेवारी महिन्याचे कॅलेंडर देण्यात आले असून, त्यामध्ये १ ते १० जानेवारीदरम्यान किती दिवस शाळा भरली, असा एक प्रश्न पान नं. ८६ वर विचारण्यात आला आहे. त्याच्या उत्तरादाखल शाळा सात दिवस होती, असे दिले आहे. त्याऐवजी शाळा आठ दिवस होती, असे देणे गरजेचे असल्याची माहिती पुस्तक परीक्षणासाठी देण्यात आलेल्या अहिल्यादेवी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक तथा गणिततज्ज्ञ दीनानाथ गोरे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT