Pune Grand Challenge Tour Pudhari
पुणे

Bajaj Pune Grand Tour: पुण्याची जागतिक ओळख घडवणारी सायकल स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या सहभागावर प्रशासनाचा भर

पुण्याला जागतिक पर्यटन-क्रीडा हब बनवण्याचा प्रयत्न; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याची पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक हब म्हणून ओळख निर्माण करण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने तयारी करीत आहे. जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा संघ, ग्रामंपचायतीने सक्रिय सहभाग घेत स्पर्धा यशस्वी करण्याकरिता एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बोलत होते. यावेळी जिल्हा‍ नियोजन अधिकारी, विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा संघाचे सदस्य तसेच संबंधित ग्रामंपचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

डुडी म्हणाले, पुणे शहराला असलेला सायकलीचा इतिहास, येथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता, ऑलिम्पिक स्पर्धेकरिता सायकलपटूंना प्रोत्साहित करणे या सर्व बाबींचा संगम साधून 'टूर द फ्रांस' या स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्यात 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' स्पर्धेचे १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे. यूसीआय सायकलिंग कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समावेश करण्यात आला असून, स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जगभरात होणार आहे. संपूर्ण स्पर्धा ही चार टप्प्यांत होणार असून, जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यांतून समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेची एकूण लांबी ४३७ किलोमीटर, ४० देशातील १७६ सायकलपटू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. त्यामुळे या स्पर्धेकरिता विद्यापीठ व महाविद्यालयांनी आपले विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पाठवावे. ग्रामीण भागातील सरंपचांनी गावातील गणेश मंडळाचे सदस्य, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्त्व सांगून सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे. गावपातळीवर पारंपरिक, सांस्कृतिक पद्धतीने स्वागत करावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT