पांडेश्वर मंदिरात बहमनी कालखंडातील शिलालेखाचा शोध Pudhari
पुणे

Bahamani Period Inscription Discovery: पांडेश्वर मंदिरात बहमनी कालखंडातील शिलालेखाचा शोध

चौदाव्या शतकातील देवनागरीतील लेखातून दानसंस्कृती, स्थानिक सत्तेचे पुरावे उलगडले

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महादेव (पांडेश्वर) मंदिराच्या परिसरातील मारुती मंदिरासमोर प्राचीन शिलालेख आढळला. चौदाव्या शतकातील हा शिलालेख देवनागरी लिपीत कोरला आहे. यामुळे त्या काळातील दानप्रथा, करमुक्त जमिनींची परंपरा आणि स्थानिक सत्तेचे अस्तित्व उलगडते. (Latest Pune News)

हा शिलालेख ओबडधोबड, आयताकृती आहे. त्यावर सूर्य, चंद्र आणि शिवलिंगाच्या कोरीव आकृती आहेत. तसेच या शिळेवर नऊ ओळी कोरल्या आहेत. ती अक्षरे काही प्रमाणात झिजली आहेत. त्यामुळे अक्षरांचा अर्थबोध होण्यास कठीण गेल्याचे सांगण्यात आले.

शिलालेख शालिवाहन शके 1269 म्हणजे इ. स. 1347 मधील आहे. त्यात श्री मंडलिक रघुराव महादेव यांनी पांडवेश्वर देवालयाच्या कामासाठी करमुक्त जमीन, एक मळा आणि 10 रुके कायमस्वरूपी दान दिल्याचा उल्लेख आहे. ‌‘निस्रोत्रा करुनु सांडिजले‌’ या शब्दांद्वारे धार्मिक दान अर्पण केल्याचे नमूद आहे. तसेच दान मोडणाऱ्याला शापही या शिलालेखातून देण्यात आला आहे.

शिलालेखातून त्या काळातील अर्थव्यवस्था, जमिनीची मोजणी, चलनप्रणाली, देवालय दानसंस्कृती यांचे पुरावे मिळतात. ‌‘पांडवेश्वर देवाचे काम‌’ असा उल्लेख असल्याने त्या काळी हे मंदिर धार्मिक आणि सामाजिक केंद्र होते हे देखील स्पष्ट होते.

हा शिलालेख बहमनी कालखंडाच्या सुरुवातीचा मानला जातो. यादव सत्तेनंतर स्थानिक मंडलिक राजसत्तेचे अस्तित्व दाखविणारा पुरातत्त्वीय दस्तावेज आहे. या शिलालेखाचे वाचन व संकलन अथर्व पिंगळे आणि अनिल किसन दुधाणे यांनी केले. त्यांना संशोधन कार्यात महेंद्र नवले व खालिद शेख यांचे सहकार्य लाभले.

प्रस्तुत शिलालेखात येणारा मंडलिक रघोराव (राघवराव) यांचा उल्लेख फार महत्वाचा आहे. मंडलिक म्हणजे मंडल अथवा प्रदेशाचा अधिपती. हे राघव पुरंदर भागातील स्थानिक शासक असून, बहुधा दिल्ली सल्तनतीच्या अंकित असावेत.
अथर्व पिंगळे
या शिलालेखात आलेला षरचु म्हणजे खर्च हा शब्द महाराष्ट्रात इस्लामी राजवटींच्या संपर्कामुळे प्रशासनामध्ये रूढ होऊ लागलेल्या अरबी-फार्सी संज्ञांपैकी एक अतिशय जुना नमुना ठरेल.
अनिल दुधाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT