खेड: कितीही चांगलं काम केलं, तरी त्यांची नावं ठेवण्याची सवय जाणार नाही. ते स्वतःच स्वतःवर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी संविधानाचा अवमान होईल अशा खालच्या शब्दांत रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांवर अशोभनीय टीका केली, अशी टीका आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याविरोधात केली. काहीही झाले तरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने कुणा अधिकाऱ्यांवर अन्याय होणार असेल तो सहन केला जाणार नाही, असेही आ. काळे यांनी सांगितले.
चांडोली ग्रामीण रुग्णालयात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 19) आ. काळे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी दिलीप मोहिते पाटील यांचा नामोल्लेख टाळून ही टीका केली. (Latest Pune News)
या वेळी व्यासपीठावर चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजश्री रानडे, शिवसेनेच्या महिला संघटक विजयाताई शिंदे, जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष बाळासाहेब ताये, चांडोलीच्या सरपंच प्रियांका पवळे आदी उपस्थित होते.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मागील आठवड्यात चांडोली रुग्णालयात कार्यकर्त्यांसह येऊन आंदोलन केले होते. रुग्णांची दखल घेत नाही तसेच सेवा देताना अरेरावी केल्याचा आरोप करून एका डॉक्टरला निलंबित करावे, अशी मागणी केली होती.
त्यावरून चांगले काम करणाऱ्यांना नाव ठेवण्याची काहींची सवय आहे. मात्र, पदाच्या माध्यमातून शासनाने दिलेले काम जबाबदारीने पार पाडा, असे म्हणत आ. बाबाजी काळे यांनी सुनावले.