पुणे: हुबेहूब साकारण्यात येणारी राजमहालाची प्रतिकृती... त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई... भव्य उत्सव मंडपाची उभारणी अन् कार्यक्रमांच्या नियोजनात व्यग्र असलेले विश्वस्त मंडळ... असे उत्साही वातावरण श्री महालक्ष्मी मंदिरात आहे. नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि. 22) सुरुवात होणार असून, यानिमित्ताने मंदिरात जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मंदिरात राजमहालाची सजावट करण्यात येत असून, पुण्यातील सजावटकारांकडून ही आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तसेच, मंदिरात उत्सवाच्या दहाही दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे आणि यानिमित्ताने आदिशक्तीचा जागर महालक्ष्मी मंदिरात होणार आहे. (Latest Pune News)
श्री महालक्ष्मी मंदिरात (सारसबागेसमोरील) नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येते. यंदाही सजावटीचे काम पूर्ण झाले असून, मंदिरात यावर्षी राजमहालाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे, त्यात सोनेरी आणि लाल रंगाचा मेळ साधण्यात आला आहे. याशिवाय पारंपरिक पद्धतीनेनवरात्रोत्सव करण्यासाठी विश्वस्त आणि पदाधिकारी सज्ज आहेत.
सोमवारी (दि. 22) सकाळी नऊ वाजता गोपालराजे पटवर्धन, पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. मंदिराचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रावाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रावाल, भरत अग्रावाल, डॉ. तृप्ती अग्रावाल, विश्वस्तॲड. प्रताप परदेशी, नारायण काबरा, हेमंत अर्नाळकर, राजेश सांकला, प्रवीण चोरबेले आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
‘दशावतार’ सादरीकरण अन् रोषणाईचे उद्घाटन
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यावर पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, रात्री साडेआठ वाजता राधिका आपटे यांचे दशावतार सादरीकरण देखील होईल.
तसेच, सायंकाळी सहा वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल. मंदिरात दहाही दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रम रंगणार आहेत. उत्सवातील दहा दिवसांच्या कार्यक्रमांची तयारीही पूर्ण झाली आहे. मंदिराच्या बाहेर सध्या उत्सव मंडपाच्या उभारणीचे काम सुरू असून, उत्साहात आणि आनंदात नवरात्रोत्सव रंगणार आहे.