पुणे: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत असलेल्या उपचारांची संख्या वाढविण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. योजना समाविष्ट असलेल्या पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या 68 वरून 206 करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात या योजनेंतर्गत सुमारे 42 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ह्रदयविकारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच अस्थिरोग शस्त्रक्रियांची संख्या सर्वाधिक आहे.
आयुष्मान भारत-महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबाचा 5 लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत उत्पन्न आणि रेशन कार्डांची मर्यादा होती. आता जिल्ह्यातील कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिकाला योजनेचा लाभ घेता येणे शक्य आहे.
कागदपत्रांची पूर्तता केल्यास रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकणार आहेत. योजनेमध्ये आत्तापर्यंत जिल्ह्यातील 68 रुग्णालयांचा समावेश होता. आता ही संख्या 206 पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेंतर्गत 1356 प्रकारचे उपचार मोफत पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचारांची संख्या वाढत असली, तरी आयुष्मान भारत कार्डचे उद्दिष्ट गाठण्यात अद्याप समाधानकारक यश मिळालेले नाही. कार्ड वाटपासाठी 66 लाख 48 हजार 595 लाभार्थींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी 19 लाख 46 हजार जणांना म्हणजे केवळ 29 टक्के नागरिकांना कार्ड वाटप झाले आहे. तसेच, 47 लाख 2 हजार नागरिक म्हणजे 71 टक्के उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही.
आयुष्मान भारत-महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबाचा 5 लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिकाला योजनेचा लाभ घेता येणे शक्य आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यास रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात. योजनेमध्ये आत्तापर्यंत जिल्ह्यातील 68 रुग्णालयांचा समावेश होता. आता ही संख्या 206 पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेअंतर्गत 1356 प्रकारचे उपचार मोफत पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहेडॉ. वैभव गायकवाड, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले योजना