मंचर : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील स्वीटी अक्षय बागल (वय 27) हिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू हा बिबट्याच्या धसक्याने नव्हे तर पतीच्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार तिच्या आईने केली. त्यामुळे स्वीटीच्या पतीवर आता सद्यःस्थितीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Pune News)
परंतु पतीनेच स्वीटीचा छळ करून खून केल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. असे असले तरी स्वीटीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा नवरा अक्षय बाळासाहेब बागल (रा. अवसरी बुद्रुक) याला मंचर पोलिसांनी अटक केली. याबाबत स्वीटीची आई बबिता संजय टाव्हरे यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वीटीचा विवाह मे 2024 मध्ये अक्षय बागल याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवसातच अक्षय हा स्वीटीला दारू पिऊन मारहाण करू लागला. याबाबत स्वीटीने तिच्या आईला सांगितले होते. स्वीटी गरोदर राहिल्यानंतर अक्षय तिला वारंवार विविध कारणावरून मारहाण करीत होता. ऑगस्ट महिन्यात स्वीटीला आठवा महिना असताना स्वीटी तिच्या माहेरी आईकडे आली असता अक्षयने स्वीटीच्या माहेरी येऊन तिला मारहाण केली. त्यानंतरही तिला मारहाण करण्यात आल्याचे स्वीटीच्या आईने सांगितले.
26 सप्टेंबर रोजी अक्षयने केलेल्या मारहाणीमुळे तिच्या गर्भाशयात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिला मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिचे सिझरिंग केल्यानंतर तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वीटीवर पुणे येथे उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा रविवारी (दि. 5) मृत्यू झाला. स्वीटीच्या मृत्यूला तिचा नवरा अक्षय बागल जबाबदार असल्याची फिर्याद मंचर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अक्षय बागलवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, उपनिरीक्षक सुनील धनवे यांनी ही माहिती दिली.