मंचर: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मातोश्री मुलींच्या वसतिगृहातील खंडित पाणीपुरवठा विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (दि. २१) सुरळीत करण्यात आला. रविवार (दि. १६) पासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त विद्यार्थिनींनी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी रिकाम्या बादल्या घेऊन प्रशासनासमोर ठिय्या आंदोलन केले होते.
मातोश्री वसतिगृहाच्या चार विभागांत सुमारे २१९ विद्यार्थिनी राहतात. यापूर्वीही पाणीपुरवठा अनियमित होत असल्याच्या तक्रारी होत्या. दररोज दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, गुरुवारी टँकरच्या फेऱ्या उशिरा झाल्याने विद्यार्थिनींनी आंदोलन करण्याबरोबरच जेवणावरही बहिष्कार टाकला. प्रशासनाने दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी जेसीबी व कामगारांच्या मदतीने पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधील दोष शोधण्यात आला. पाइपमध्ये साचलेला कचरा आणि झडपांमधील अडथळे दूर करून पाइपलाइन स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर उच्च दाबाने पाणी सोडण्यात आले. दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील पाणीपुरवठा सुरळीत झाला.
चांडोली खुर्द येथून ८ किलोमीटर अंतरावरून महाविद्यालयाच्या पश्चिमेकडील मुख्य टाकीत पाणी आणले जाते. या टाकीची क्षमता चार लाख लिटर असून, येथून अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाला पाणीपुरवठा केला जातो. विद्यार्थिनींच्या वसतिगृहात पाणी कमी पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही संबंधित विभागाने दिली.
महाविद्यालय सुरू झाल्यापासून चांडोली येथील नदीवरून ८ किलोमीटर लांबीची स्वतंत्र पाइपलाइन उभारण्याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर, विद्यार्थिनींना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणे योग्य नाही. पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल. भविष्यात अशी समस्या उद्भवू नये, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पंचायत समिती सदस्य नीलेश टमकर यांनी सांगितले.