August monsoon update
पुणे: राज्याच्या सर्वच भागांत यावर्षी वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनने राज्याच्या काही भागांत जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला, तर काही ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. दरम्यान, हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मान्सून हंगामातील दुसर्या टप्प्यातील म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज दिला. मान्सूनच्या दुसर्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. दोन्ही महिन्यांत सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. (Latest Pune News)
मात्र ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यात पाऊस विश्रांती घेणार असल्याचे अदांजातून दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाचा राहण्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज आहे, तर तिसर्या आठवड्यापासून पाऊस सुरू होऊन चौथ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
देशात ऑगस्ट महिन्यात हवामान विभागाने सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज दिला. तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.