

शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुका दोन-तीन महिन्यांत येऊन ठेपल्या आहेत. नगर परिषदेचा इतिहास पाहता, या ठिकाणी पक्षावर निवडणुका झाल्या नसल्या तरी गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे काही पक्षांनी त्या काळात विविध विकासकामे केली, आंदोलने केली, त्यामुळे मतदार व नागरिक यांना हे पक्ष लक्षात राहतील, असे चित्र सध्या दिसत आहे. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षीय चिन्ह बाजूला ठेवून सर्व जण एकत्र येत असले तरी पक्षाच्या माध्यमातून नागरिकांसमोर काही लोक गेलेले आहेत.
शिरूर शहरात भाजप, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन्ही गट यासह जनता दल, बहुजन मुक्ती पार्टी, मनसे ,काँग्रेस या पक्षांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून विविध आंदोलने केली. सत्तेच्या माध्यमातून विकासकामे आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. (Latest Pune News)
महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन आमदार अशोक पवार व विविध पक्षातील शहराध्यक्ष यांनी त्यावेळेस शिरूर शहरात विकासकामे करण्यासाठी निधी आणला. सत्तांतरानंतर महायुतीचे राज्य सरकार असताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर नगरपरिषदेसाठी 72 कोटींची पाणीपुरवठा योजना आणली तर भाजपने शहराच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठविला.
मनसेचे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय देशमुख व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मुज्जफर कुरेशी हे दोन्ही माजी नगरसेवकांनी विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले.
शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख मयूर थोरात यांना नगरपालिका शाळेसाठी पाच कोटीपेक्षा जास्त निधी आणण्यात यश आले. काँग्रेसने आंदोलन करून लक्ष वेधले. शहरातील अनेक प्रश्नां संदर्भात बहुजन मुक्ती पार्टीने आंदोलन करत समस्येला वाचा फोडली.
निवडणुकीतील फायदा सांगणे कठीण
सर्व पक्ष नागरिकांच्या समस्यासाठी पुढे येत असले तरी आगामी निवडणुकीत त्यांना त्याचा किती फायदा होईल हे मात्र सांगणे अवघड आहे. निवडणुका या पक्ष चिन्हावर न झाल्यामुळे भविष्यात या पक्षातील उमेदवारांना आपण काय कामे केली आहेत, हे नागरिकांसमोर सांगावे लागेल. शिरूर शहरातील हेच पक्ष सध्या आघाडीवर असून, अनेक समस्या संदर्भात नागरिकांच्या त्यांच्याकडून आशा आहेत.