मंचर: अपघात झाल्याप्रकरणी केवळ विमा कंपनीकडून पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मृताचा मुलगा आणि वारसांनी चुकीची फिर्याद देऊन खोटा दावा दाखल केल्याचे तपासात निष्पन्न झाले. विमा कंपनीकडून विमा मिळवण्यासाठी पोलिसांची खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. तसेच विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी माहिती दिली.
शिवाजी काळोखे (रा. कडुस, ता. खेड) नामदेव बोर्हाडे (रा. जऊळके खुर्द ता. खेड), विठ्ठल कदम (रा. एकलहरे), किरण आवटे (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याबाबत विमा कंपनीचे सल्लागार मुझम्मिल अर्शद शेख यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकलहरे (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत पुणे - नाशिक रोडवर शकुंतला हॉटेलजवळ सुरेश त्रिपती आवटे यांच्या दुचाकीचा दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी अपघात झाला होता. त्यात आवटे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
त्यानंतर अपघात प्रकरणी दि. 31 मार्च 2019 रोजी मृत सुरेश आवटे यांचा मुलगा किरण सुरेश आवटे याने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात त्याने अपघात आणि वडिलांच्या मृत्यूस कंटेनर (एमएच 14 एफडी 3666) चालक कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, अपघातात कारणीभूत असलेल्या कंटेनरला आयसीआयसीआय लोमबार्ड जीआयसी लिमिटेड कंपनीचे विमा संरक्षण होते. त्यातून मृताच्या वारसांनी अपघाताची नुकसानभरपाई करावी, असा दावा दाखल केला होता. त्यानंतर विमा कंपनीने अपघाताची पडताळणी केली. त्यात मृत सुरेश आवटे हे महाळुंगे पडवळहून दुचाकीवर स्वतः जात होते.
त्या वेळी त्यांची मोटर स्लिप होऊन अपघात झाला होता. त्यात त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला. त्यामुळे त्यांना प्रथम मंचर येथील खासगी रुग्णालयात व नंतर पुणे येथील रुबी हॉल, वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा 5 मार्च 2019 रोजी मृत्यू झाला.
या अपघाताला सुरेश आवटे हे स्वतः कारणीभूत होते. मात्र, विमा कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी त्यांचा मुलगा आणि वारसांनी चुकीची फिर्याद देऊन खोटा दावा दाखल केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी फिर्यादीत दाखवलेले कंटेनरमालक नामदेव मारुती बोर्हाडे, चालक शिवाजी जिजाराम काळोखे, प्रत्यक्षदर्शी दर्शवलेले साक्षीदार विठ्ठल विष्णू कदम व फिर्यादी किरण सुरेश आवटे यांनी संगनमत करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चार जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.