इंदापूर: इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष शैलेश देविदास पवार उर्फ बाळासाहेब ढवळे (वय 45, रा.सरस्वतीनगर, ता. इंदापूर) यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. राजकीय तसेच पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
याबाबत शैलेश पवार यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास फिर्यादीच्या घराबाहेर शिवीगाळीचा आवाज आला. फिर्यादीने खिडकीतून पाहिले असता दोन पांढर्या रंगाच्या मोटारी व त्या समोर चौघेजण उभे असल्याचे दिसले. (Latest Pune News)
फिर्यादी घराबाहेर आल्यानंतर मनोज आनंदकर (रा. वडारगल्ली, इंदापुर), भुषण माने (रा. राजवलीनगर, इंदापुर) व इतर दोन अनोळखी इसमांना शिवीगाळ का करता असे विचारले. यावेळी माने याच्या हातात कोयता होता.
आनंदकर, माने व दोन साथीदार यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अंगावर धावुन जात शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील दोन ते अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावण्यात आली.
हा गोंधळ पाहून फियार्दीचा चुलत भाऊ शुभम निवृत्ती पवार तसेच आइस फॅक्टरीतील कामगार घटनास्थळी आले. त्यांना पाहून वरील चौघेजण कोयता टाकुन मोटारीतून पळुन गेले. पोलिसांनी याप्रकरणी आनंदकर, माने व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.