

वडगाव शेरी: नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाने अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी किड्झी शाळेला एक लाख रुपयांचा दंड केला होता. त्यानंतर प्रशासनाने फक्त पंधरा हजार रुपये वसूल करून या शाळेवर नाममात्र कारवाई केली.
आकाशचिन्ह विभागाचा हा सावळा गोंधळ दै. ‘पुढारी’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाने या शाळेकडून उर्वरित 85 हजार रुपये दंड अखेर वसूल केला आहे. वडगाव शेरीतील टेम्पो चौकामध्ये किझजी शाळेने 3 बाय 2 चे शंभर परिसरात फ्लेक्स लावले होते. या फ्लेक्सवर आकाश चिन्ह विभागाने कारवाई करत एक लाख रुपयांचा दंड केला होता. (Latest Pune news)
परंतु, कालांतराने फक्त 15 हजार रुपये वसूल केले होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला. याबाबतचे वृत्त दै. पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे आकाशचिन्ह विभागातील सावळा गोंधळ उडकीस आला होता.
त्यांनतर प्रशासकीय घडामोडींनी वेग आला. प्रशासनाने शाळेला नोटीस पाठवून मिळकत करातून दंड वसूल करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शाळेने तात्काळ दंडाची रक्कम भरली असल्याची क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्यांनी सांगितले.
तक्रारदार करिम शेख म्हणाले की, अनाधिकृत फ्लेक्सबाबत तक्रार करून प्रशासनाकडून कारवाई होत नाही. फ्लेक्सवर कारवाई करण्याऐवजी प्रकरणे परस्पर मिटवले जातात. आकाशचिन्ह विभागातील गैरव्यवहाराची महापालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
अनाधिकृत फ्लेक्सप्रकरणी किड्झी शाळेकडून एक लाख रुपये दंड वसूल केला आहे. मनुष्यबळ कमी असल्याने, कारवाई करण्यास अडचणी येत आहेत.
- विनोद लांडगे, अधिकारी, आकाशचिन्ह विभाग, नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय