ATS Inquiry Pudhari File Photo
पुणे

Pune ATS Shahzad Bhatti Investigation: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुणांची चौकशी; पुणे जिल्ह्यात ATS चे ६५ ठिकाणी छापे

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिस अलर्ट; सोशल मीडियातून चालणाऱ्या नेटवर्कचा शोध, संशयितांची झाडाझडती सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे/ पिंपरी: पाकिस्तानस्थित, दहशतवादी कारवाईत गुंतलेला गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुणांची मोठी माहिती हाती लागल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जिल्ह्यात ६५ ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली. यामधील काही संशयित तरुणांची माहिती एटीएसने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांना देखील दिली आहे.

या संशयित तरुणांकडे चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा पोलिस अलर्ट झाले असून, त्यांनी देखील या संशयितांची झाडाझडती सुरू केली आहे.

भट्टी हा पाकिस्तानातील एक मोठा गुंड असून, आयएसआय या प्रमुख लष्करी गुप्तचर संस्थेचा एजंट म्हणून देखील काम करत असल्याची माहिती आहे. विदेशात बसून सोशल मीडियावरून तो आपले रॅकेट चालवतो. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील तरुण देखील त्याच्या संपर्कात असल्याचे दिल्ली पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत समोर आले होते.

भट्टीच्या संपर्कात असलेल्या तरुणांची चौकशी करून त्यांना भट्टी आणि साथीदारांच्या विळख्यातून सोडविणे, तसेच गंभीर बाब आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी चौकशी करण्यात आली, असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बनावट नोटा, अमली पदार्थ, शस्त्रांची तस्करी

देशातील तरुणांना आर्थिक प्रलोभन दाखवून भट्टी गुन्हेगारी कृत्याला उत्तेजन देत असल्याचे दिसते. भट्टी पाकिस्तानातून भारतात बनावट नोटांचे रॅकेट चालविणे, अमली पदार्थांची तस्करी, त्याचबरोबर सीमेपलीकडून शस्त्रे पाठवून देत असल्याचेसुद्धा तपासात पुढे आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT