पुणे

Pune News : एटीएमएस सिग्नल असून अडचण, नसून खोळंबा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध चौकांमध्ये पुणे स्मार्ट सिटीमार्फत बसविण्यात आलेल्या एटीएमएस (ऍडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) सिग्नल यंत्रणेमुळे अनेक चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागत आहेत. शिवाय अनेक चौकांमध्ये पादचार्‍यांसाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बसविलेले हे सिग्नल असून अडचण, नसून खोळंबा अशीच झाली आहे. शहरात खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.

ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील प्रमुख 125 चौकांमध्ये अत्याधुनिक 'एटीएमएस' सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले आहे. सुमारे 102 कोटी 62 लाख रुपयांचे हे काम नवी दिल्लीच्या कंपनीला देण्यात आले. पुढील पाच वर्षे ही यंत्रणा चालविणे व देखभाल दुरुस्ती करणे यासाठी प्रतिवर्षी 11 कोटी 58 लाख असा एकूण 57 कोटी 94 लाख रुपये खर्चही येणार आहे.

एटीएमएस सिग्नल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जवळपास 115 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा सिग्नलला थांबलेल्या वाहनांच्या संख्येची मोजणी करून स्वत:ची वेळ स्वत: निश्चित करेल, ज्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिक असेल, त्या रस्त्यावर हिरव्या सिग्नलचा वेळ जास्त असेल.

तर ज्या रस्त्यावरील वाहने सिग्नलच्या पुढे जातील आणि एकही वाहन नसेल तेव्हा सिग्नल इतर बाजूची वाहतूक आपोआप सुरू करेल. सिग्नलमध्ये काही बिघाड झाल्यास अथवा वाहतूक कोंडी झाल्यास त्याची माहिती मेसेजद्वारे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीम, महापालिका तसेच वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेला मिळेल, सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील, असे प्रशासनाकडून त्या वेळी सांगण्यात आले होते.

मात्र, एटीएमएस सिग्नल व्यवस्था बसवल्यानंतर पूर्वी वाहतूक कोंडी होत नसलेल्या रस्त्यांवर व चौकांमध्ये कोंडी होत असल्याचा असल्याचे चित्र दैनिक 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे तसेच वाहनांची संख्येनुसार सिग्नलच्या वेळेत बदलही होत नसल्याचे निदर्शनास आलेले नाही. अनेक चौकांत पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

पाच ते दहा सेकंदांचा वेळ देण्यात आल्याने पादचार्‍यांना वाहनांशी लपंडाव खेळत रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही परिस्थिती 'जैसे थे'च राहणार असेल, तर एटीएमएसचा घाट नेमका कुणासाठी घालण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेकडे नाही वाहनांच्या संख्येची माहिती

एटीएमएस सिग्नलवरील सीसीटीव्हीमुळे कोणत्या रस्त्यावर जास्त वाहने ये-जा करतात हे समजेल, अशी यंत्रणा बसविण्यापूर्वी प्रशासनाने सांगितले होते. आता मात्र, महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी या संदर्भातील माहिती स्मार्ट सिटीने पाठवली नसल्याचे सांगत आहे.

बिबवेवाडीकडून स्वारगेट व सहकारनगरच्या दिशेने जाणार्‍या वाहनांची पुष्पमंगल (माणिकशेठ दुगड) चौकात पूर्वी कोंडी होत नव्हती. मात्र, सातारा रस्त्यावर या चौकात एटीएमएस सिग्नल बसविल्यापासून बिबवेवाडीकडून सातारा रस्त्यावर येणार्‍या वाहनांना दररोज सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

– दत्तात्रय तिकोणे, सुखसागरनगर.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT