पुणे : एटीएम कार्डची हेराफेरी करून रोकड लंपास करणार्या आंतरराज्यीय टोळीला खडकी पोलिसांनी जेरबंद केले आहे. एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठांना मदतीच्या बहाण्याने ही टोळी टार्गेट करत होती. पुण्यात त्यांनी अनेक ठिकाणी एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. हे चोरटे चोरी करण्यासाठी विमानाने पुण्यात येत होते. सावेज सलीम अली (वय 30, रा. लोणी गाजियाबाद, उत्तर प्रदेश), नियाज इजाज मोहम्मद (वय 29, रा. लोणी गाजियाबाद) अशी या चोरट्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.
खडकीतील एका एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी संजय गोपीनाथ कदम (वय 63) हे 9 मे रोजी गेले होते. त्यांना एटीएम मशीनवरून पैसे काढत असताना त्यांचा पिन चोरट्यांनी पाहिला. त्यांना एटीएममधून पैसे काढत असताना पैसे काढून देतो, असे सांगून एटीएम कार्डची मागणी केली. मात्र, कदम यांनी नकार दिल्यावर आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्याकडील कार्ड घेऊन ते पळून गेले. त्यानंतर दुसरीकडे विविध ठिकाणांवरून त्यांनी त्यांच्या खात्यातील एक लाख चार हजार 650 रुपये काढून घेतले होते. कदम यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, खडकीतील गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. तसेच, कदम हे सुरक्षारक्षक म्हणून तुटपुंजा पगारावर आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांची आयुष्यभराची कमाई चोरट्यांनी लांबविली होती. अशा संवेदनशील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी तपास पथकाकडे दिला होता.
पोलिसांची विविध पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती उपलब्ध करून शोध घेण्याचे काम सुरू होते. त्यात पोलिस अंमलदार प्रताप केदारी ऊर्फ आबा यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून विविध शहरात फिरत असतात. सध्या नाना पेठेतील एका लॉजमध्ये उतरले आहेत. त्यावरून पोलिस अंमलदार ऋषिकेश दिघे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. ते लॉजमध्ये असल्याची खात्री होताच तपास पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलिस अंमलदार अनिकेत भोसले, सुधाकर राठोड, सुधाकर तागड, गालीब मुल्ला, दिनेश भोई यांच्या पथकाने छापा घालून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी करण्यासाठी ते विमानाने प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून 69 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. हे चोरटे परराज्यातील असून त्यांनी इतरही ठिकाणी अशाच प्रद्धतीने चोरी केल्याचे ते सांगतात.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलिस हवालदार प्रशांत माळी (देहूरोड पोलिस ठाणे), संदेश निकाळजे, आश्विनी कांबळे, भाऊसाहेब शेवरे, पोलिस अंमलदार सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, प्रताप केदारी, गालीब मुल्ला, प्रवीण गव्हाणे, शिवराज खेड यांनी केली आहे.