पुणे: ‘पक्ष असेल तर सरकार आहे’ हा संदेश अटलजींनी दिला. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्याचे काम सर्वच जण करतात. ते काम करायला जी ऊर्जा मिळते ते अटलजींसारख्या व्यक्तींच्या सलगी देण्यामुळे होते. त्यांच्यासारख्या नेत्यांशी सलगीमुळे कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तिकीट गेले, तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही, अशी भावना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
पुणे पुस्तक महोत्सवात मोरया प्रकाशनतर्फे मेधा किरीट यांनी लिहिलेल्या ‘अटलजी : एक वतस्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, माजी खासदार किरीट सोमय्या, मेधा किरीट, दिलीप महाजन, डॉ. सुनील भंडगे आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात ‘हेल्दी रिलेशन’ आज राहिलेले नाही. मीही विरोधी पक्षनेता असताना त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करायचो आणि त्यांच्याबरोबर जेवणही करायचो. याखेरीज बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारही एकमेकांवर प्रखर टीका करायचे; पण जेवायला एकत्र असायचे. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेवेगळे पैलू समाजाशी बांधिलकी असलेल्या व्यक्तीने नीट अभ्यासले पाहिजेत.
अटलजींनी त्यांच्या काळात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. गावापर्यंत रस्ते बांधले, सुवर्ण चतुर्भुज निर्माण केला. देशातील 40 टक्के जनता गावाच्या बाहेरच पडत नाही. त्यांच्यासाठी मोफत धान्य, किसान सन्मान योजना, महिलांना उद्योग निर्माण करणे अशा योजनांची प्रेरणा मिळाली. नागरिकांना प्रत्यक्ष फायदा आणि अप्रत्यक्ष फायदा, अशा प्रकारचे राजकारण महत्त्वाचे आहे. 2047 ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे होतील, त्या वेळचा भारत कसा असेल, याची कल्पना अटलजींनी केली असावी, असेही तावडे यांनी सांगितले.
मुशरफ यांच्याबरोबरची आग््राा येथील समिट अयशस्वी ठरली होती, पण किसीने छेडा तो छोडेंगे नहीं, हे अटलजींनी कारगिल युद्धावेळी दाखवून दिले. ‘पक्ष असेल तर सरकार आहे’ हा संदेश अटलजींनी दिला. त्यामुळे तिकीट गेले, तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही. कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा नेत्यांच्या सलगी देण्यामुळे मिळते, असेही तावडे यांनी नमूद केले.