येरवडा: येरवडा येथे ठेकेदारांकडून नाले सफाईच्या कामात केवळ चेंबरमधील गाळ काढला जात आहे. मात्र, पावसाळी आणि ड्रेनेज लाइनची पूर्णपणे साफसफाई केली जात नाही. मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अर्धवट कामे करून ठेकेदार लाखो रुपयांचा मलिदा लाटत असल्याचे दिसून येते. या कामांची तपासणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Latest Pune News)
येरवडा परिसरात पावसाळापूर्व नाले सफाईची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे नाले तुंबत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
माजी नगरसेविका अश्विनी लांडगे म्हणाल्या की, सरगम हॉटेलसमोर पुन्हा पावसाचे पाणी तुंबल्याने टायगर मशिनच्या सहाय्याने नुकताच गाळ काढण्यात आला. या भागात नाले सफाईचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र ठेकेदार केवळ चेंबरमधील गाळ काढून साफसफाईचे काम केल्याचा दिखावा करीत आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबत असल्याने नाले सफाईच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. यामुळे या कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी.
नागरिकांकडून नाले सफाईच्या कामाबाबत प्राप्त होणार्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाईल. संबंधित ठिकाणी अधिकारी आणि कर्मचार्यांना पाठवून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.- विनायक शिंदे, उपअभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका