सहायक आयुक्तांचे अधिकार्‍यांना खडेबोल; कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा Pudhari
पुणे

Pune: सहायक आयुक्तांचे अधिकार्‍यांना खडेबोल; कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा

औंध क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीची बैठक

पुढारी वृत्तसेवा

बाणेर: पावसाळ्यात होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी अभियंते आणि कर्मचार्‍यांनी कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाईल, असा इशारा औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी दिला.

क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. याबाबत दापकेकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना फैलावर घेतले. (Latest Pune News)

या बैठकीला विविध विभागाच्या अधिकार्‍यांसह बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे शकिल सलाती, एस. ओ. माशाळकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रीती काळे, सुनिता निजामपूरकर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नाना वाळके, यार्दीच्या मीनल धारगावे, वसंत जुनवणे, रितेश निकाळजे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालेवाडीतील रणभूमीजवळील ड्रेनेजची समस्या, साई सिलीकॉन सोसायटीजवळ तुंबणारे पावसाचे पाण्यामुळे रहिवाशांची होणारी गैरसोय, राधा चौकात बंद बसलेले पथदिवे, अमर टेक पार्कजवळ एसटीपी प्रकल्प बंद असल्याने वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, बीटवाईज चौकातील सांडपाणी, पुराणीक सोसायटीचे रस्त्यावर येणारे सांडपाणी, बोपोडीतील मानाजी बाग येथील तुंबलेले चेंबर आदींसह विविध समस्या नागरिकांनी या वेळी मांडल्या.

तसेच महाळुंगेतील अनधिकृत बाजारावर कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सूस रस्त्यावरील बांधलेले स्वच्छतागृह अजूनही सुरू झाले नसल्याचे नागरिकांनी या प्रसंगी सांगितले.

बाणेर येथील कचरा वर्गीकरण शेडमध्ये विद्युत दिवे, पंखे बसवण्यासह ज्युडीओजवळील वीजेच्या डीपीचा धोका, तसेच बोपोडी येथील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबाबतही नागरिकांनी या वेळी समस्या मांडली.

एखादी दुर्घटना घडली, तर संबंधित खात्याच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात येईल, याची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही या वेळी सहायक आयुक्त दापकेकर यांनी अधिकार्‍यांना सुनावले.

अहवाल सादर करण्याचे आदेश

बाणेर-बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनेक ठिकाणी नागरी सुविधांच्या अभावामुळे होणार्‍या गैरसोयीबाबत नागरिकांनी या वेळी व्यथा मांडल्या. विशेष करुन तुंबलेल्या सांडपाणी वाहिनी, पथदिवे, वीजेच्या समस्या, रस्ता दुरुस्ती आणि कचर्‍याच्या प्रश्नावर नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या तक्रारी तातडीने सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक आयुक्त दापकेकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT