पुणे: महाराष्ट्र खूप समृद्ध आहे. महाराष्ट्राने जगाला, देशाला खूप काही दिले आहे. त्यात महाराष्ट्राने जगाला, देशाला सर्वांत महत्त्वाची गोष्ट दिली ती म्हणजे लता मंगेशकर यांच्यासारखी दिग्गज गायिका.
लतादीदींचा उल्लेख आपण भारताची सांस्कृतिक दूत असाच केला पाहिजे. भारतात दिग्गज कलाकारांची मोठी यादी आहे, ज्यांनी भारताचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध केले. पण, खऱ्या अर्थाने लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीय हे भारताचे सांस्कृतिक दूत आहेत, अशी भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 28) व्यक्त केली. (Latest Pune News)
दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या जन्म दिनानिमित्त ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार गायिका मधुरा दातार यांना आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी शेलार बोलत होते. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री प्राजक्ता माळी, सुशील कुलकर्णी आणि शिरीष रायरीकर या वेळी उपस्थित होते.
या वेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली. अच्युत गोडबोले, प्राजक्ता माळी, डॉ. धनंजय केळकर, सुशील कुलकर्णी यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना मधुरा दातार म्हणाल्या, महाविद्यालयात असताना मला पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात गायनाची संधी मिळाली. तो माझ्यासाठी सोन्याचा दिवस होता. लतादीदींच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आभाळाएवढा आनंद आहे आणि जबाबदारीची जाणीव आहे. लतादीदी म्हणायच्या, छान गाणे ऐकत राहा, चांगले गाणे ऐकत राहा, खूप रियाज कर. त्यांचे हे शब्द लक्षात ठेवून मी यापुढे काम करणार आहे.
मोहन जोशी, प्राजक्ता माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ‘मी लता दीनानाथ...’ हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दीनानाथ रुग्णालयावर मध्यंतरी टीकेचे सावट आले. सगळेच लोक टीका करीत होते. या वेळी मेधाताईंनी आमची चांगल्या पद्धतीने बाजू मांडली. मी त्यांचे आभार मानतो, अशी टिप्पणी केली.
त्यावर डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मंगेशकर कुटुंबीयांचे आमच्यावर फार ऋण आहेत. मी काही वेगळे केले नाही, जो बोलणार नाही, किंवा खरी भूमिका घेणार नाही, तो चुकीचा असतो, मी खरी भूमिका घेतली, जे खरे आहे ते सांगणे गरजेचे होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
लतादीदींच्या जन्मदिनी मी पुरस्कार देण्याचे ठरविले. लतादीदींचे माझ्यावर अनेक ऋण आहेत. ते ऋण फेडण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करीत आहे.- पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ संगीतकार