Tukaram Maharaj Palkhi 2026 file photo
पुणे

Ashadhi wari 2026: तुकोबांच्या पालखीचा पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्ग्यात, काय आहे इतिहास?

Tukaram Maharaj Palkhi 2026: संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याला आज उत्साहात सुरुवात झाली असून, देहूनगरीतून प्रस्थान केल्यानंतर पालखीचा पहिला पारंपरिक विसावा अनगडशाह बाबा दर्ग्यावर होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ashadhi wari Tukaram Maharaj Palkhi 2026

देहू : "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..." या ओळींचा प्रत्यय दरवर्षी वारीत अनुभवायला मिळतो. जात, धर्म, पंथ आणि परंपरेच्या सर्व सीमा ओलांडत वारी संपूर्ण मानवतेला प्रेम, समता आणि बंधुभावाचा संदेश देते. संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याला आज उत्साहात सुरुवात झाली असून, देहूनगरीतून प्रस्थान केल्यानंतर पालखीचा पहिला पारंपरिक विसावा अनगडशाह बाबा दर्ग्यावर होणार आहे.

गेल्या तीनशेहून अधिक वर्षांची ही परंपरा आजही अखंडपणे जपली जात आहे. यावेळी दर्ग्यात पालखीची पहिली आरती केली जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे हे एक अनोखे प्रतीक मानले जाते. यंदाही हजारो वारकरी "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषात दर्ग्यावर दाखल होणार असून, पालखीच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. पहिला विसावा आणि आरती पार पडल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी पिंपरी-चिंचवडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचा हा संदेश आज पुन्हा एकदा देहूनगरीतून संपूर्ण जगापर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहे.

काय आहे इतिहास?

हजरत सय्यद अनगडशाह वली बाबा हे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. एकदा हजरत सय्यद अनगडशाह वली बाबा हे कटोरा घेऊन संत तुकाराम महाराजांच्या घरी गेले आणि त्यांनी भिक्षा मागितली. त्यावेळी संत तुकाराम महाराज आपल्या पत्नी रखमाबाईला जात्यावरील धान्य देण्यास सांगतात. परंतु, जात्यात फक्त चिमूटभर धान्य असते. तेव्हा चिमूटभर धान्य कसे देणार, असा प्रश्न रखमाबाई तुकाराम महाराजांना विचारतात. त्यावर तुकाराम महाराज ते धान्य द्यायला सांगतात. त्यानुसार, रखमाबाईंनी सय्यद अनगडशाह वली बाबांच्या कटोऱ्यात धान्य टाकले आणि आश्चर्य म्हणजे, तो कटोरा पूर्णपणे धान्याने भरून गेला.

तेव्हापासून सय्यद अनगडशाह वली बाबा जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्य झाले, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतील मंदिरातून प्रस्थान झाल्यावर या दर्ग्यापाशी थांबते. याठिकाणी पालखीतील पादुकांची पूजा केली जाते; तसेच आरती व अभंग गायन होऊन सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT