

पुणे : आषाढी वारी म्हटले की लाखो वारकरी, भक्तिभावाचा महासागर आणि त्याचबरोबर सुरक्षेचे मोठे आव्हान. मात्र, यंदा पुणे पोलिसांनी या आव्हानावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम ढाल उभी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस ट्रॅकिंग, अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क आणि आठ हजारांहून अधिक पोलिसांच्या तगड्या फौजफाट्याच्या बळावर यंदाची वारी सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. संशयित व्यक्ती कॅमेऱ्यात दिसताच नियंत्रण कक्षाला तत्काळ इशारा, गर्दी धोक्याच्या पातळीवर पोहोचताच एआय प्रणालीकडून स्वयंचलित अलर्ट आणि हवेतून ड्रोनची करडी नजर अशी चौफेर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
यावेळी अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, मनोज पाटील, राजेश बनसोडे, तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त गोहर हसन, संदीप भाजीभाकरे, मिलिंद मोहिते, जीवन बेनीवाल, अविनाश कुमार, सागर कवडे, प्रशांत अमृतकर, राजलक्ष्मी शिवणकर, कृषीकेश रावले, पी. आर. पाटील, सहायक पोलिस आयुक्त विवेक पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ९ ते १२ जुलैदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात मुक्कामी असतील. या कालावधीत लाखो वारकरी पुण्यात दाखल होणार असल्याने सुरक्षा, वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. यंदा प्रथमच पालखी मार्गावर एकूण २४४ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे कार्यरत राहणार आहेत.
त्यापैकी संत तुकाराम महाराज पालखीमार्गावर १२५, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गावर १०१ कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय २८ फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांच्या अभिलेखातील सराईत गुन्हेगार, फरारी आरोपी किंवा संशयित व्यक्तींची ओळख पटविली जाणार आहे. गर्दीची घनता, वाहनांची हालचाल, संशयास्पद वस्तू, महिलांची सुरक्षा आणि भांडणांसारख्या घटनांवरही एआय प्रणाली सतत लक्ष ठेवणार आहे. पालखीच्या रथांवर आणि मिरवणुकीच्या पुढे-मागे १२ जीपीएस उपकरणे बसविली आहेत. त्यामुळे पालखीचे थेट स्थान नियंत्रण कक्षासह नागरिकांनाही उपलब्ध होणार आहे.
हवेतून निगराणीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार असून, अनधिकृत ड्रोन रोखण्यासाठी विशेष अँटी-ड्रोन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गर्दीच्या ठिकाणी तातडीने निर्णय घेण्यासाठी पाच मोठी आणि एकोणीस मिनी मोबाईल कमांड वाहने तैनात केली आहेत. ही वाहने फिरते नियंत्रण कक्ष म्हणून कार्यरत राहतील. याशिवाय ५०० ठिकाणी ध्वनिक्षेपक व्यवस्था, ३०० वॉकी-टॉकी, वायरलेस संच, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टर, स्फोटक शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाची विशेष नियुक्ती केली आहे. महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले आहे.
साखळी चोरी, पाकीटमारी, मोबाईल चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी गुन्हे शाखेची साध्या वेशातील विशेष पथके पालखी मार्गावर तैनात राहतील. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनमार्ग तयार केले असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवली आहेत.
वारीदरम्यान नागरिकांना पालखीचे थेट स्थान, वाहतूक बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्गांची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत '११२' क्रमांकावर संपर्क साधा पारंपरिक बंदोबस्तासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालण्यात आली आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत वारीसाठी पुणे पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे.
२४४ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे
२८ चेहरा ओळखणारी यंत्रणा
१२ जीपीएस उपकरणे
ड्रोन व अँटी-ड्रोन प्रणाली कार्यान्वित
५ मोठी, १९ मिनी मोबाईल कमांड वाहने
५०० ठिकाणी ध्वनिक्षेपक व्यवस्था
३०० वॉकी-टॉकी संच
३० डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर
५० हँड मेटल डिटेक्टर
१२ जलद प्रतिसाद पथके
६ स्फोटक शोधक व नाशक पथके
४ अपर पोलिस आयुक्त
१३ पोलिस उपायुक्त
३० सहाय्यक पोलिस आयुक्त
१८२ पोलिस निरीक्षक
५७० सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक
६ हजार ५५२ पोलिस कर्मचारी
राज्य राखीव पोलिस दलाच्या ३ तुकड्या
१ हजार २५० होमगार्ड
नाना पेठ, पालखी विठोबा मंदिर, निवडुंग्या विठोबा मंदिर, रामोशी गेट चौक आणि संत कबीर चौक.