Ashadhi Wari 2026 : आळंदीला न जाता वारकरी थेट पुण्यात दाखल, पालखी सोहळा समिती अन्‌ प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

आळंदीतील गर्दी टाळण्यासाठी दिंड्यांनी बदलले नियोजन, सुरक्षिततेला प्राधान्य
Ashadhi Wari 2026 : आळंदीला न जाता वारकरी थेट पुण्यात दाखल, पालखी सोहळा समिती अन्‌ प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
Published on
Updated on

पुणे : आळंदीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांना आळंदीत अनावश्यक गर्दी टाळण्याच्या केलेल्या आवाहनाला दिंडी प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या अनेक दिंड्यांनी आपले नियोजन बदलले असून, अनेक वारकरी थेट पुण्यात दाखल झाले आहेत.

काही दिंड्यांनी पुण्यात मुक्कामाची व्यवस्था केली आहे. तर, काही दिंड्या आळंदीच्या बाहेरील सुरक्षित ठिकाणी थांबून पालखीच्या प्रस्थानावेळी सहभागी होणार आहेत. मध्यवर्ती पेठांसह शहर आणि उपनगरात वारकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. संकटाच्या काळातही श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम यंदाच्या वारीत पाहायला मिळत आहे.

समितीच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर अनेक दिंडी प्रमुखांनी आपल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजनात बदल केला आहे. काही दिंड्यांतील वारकरी आळंदीच्या मुख्य ठिकाणी प्रवेश न करता बाहेरील सुरक्षित ठिकाणी थांबले आहेत. काहींनी पुण्यात आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्य करण्यास प्राधान्य दिले आहे. तर, काहींनी धर्मशाळांमध्ये निवास शोधला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात आल्यानंतर वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

माउलींच्या रथापुढील श्री संत फरताळे दिंडीचे (दिंडी क्रमांक ९) प्रमुख श्रीकांत काकडे म्हणाले, की दिंडीत दर वर्षी ५०० ते ५५० वारकरी सहभागी होतात. यंदा दापोली, मुंबई, कल्याणसह विविध भागांतील सुमारे ६० ते ७० वारकरी थेट पुण्यात दाखल झाले आहेत. उर्वरित वारकरी टप्प्या-टप्प्याने येत आहेत. पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी रविवार पेठेतील अग्रसेन भवन येथे निवासाची व्यवस्था केली असून, काही वारकरी नातेवाइकांकडेही राहत आहेत. पालखी पुण्यात आल्यानंतर सर्व वारकरी पुन्हा दिंडीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माउलींच्या रथापुढील शेडगे पंच मंडळी दिंडीनेही (दिंडी. क्रमांक -४) परिस्थितीनुसार नियोजनात बदल केला आहे. दिंडी प्रमुख धनंजय बडदे यांच्या नेतृत्वाखालील या दिंडीतील वारकरी थेट पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती दिंडीतील एका वारकऱ्यांनी दिली.

माउलींच्या रथामागील श्री गणेशनाथ महाराज संस्थानचे (दिंडी क्रमांक १८३) दिंडी प्रमुख अरविंदनाथ गिरी म्हणाले, समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रस्थान सोहळ्यात दिंडीतील दहा वारकरी सहभागी होणार आहेत. परंतु दिंडीत सहभागी होणारे विविध जिल्ह्यातील इतर वारकरी बुधवारी पुण्यात दाखल होणार आहेत. शनिपार येथे एका ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था केली असून, आम्ही पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील श्री विठ्ठल भजनी मंडळाचे दिंडी प्रमुख ज्योतिराम नरके यांनी सांगितले, की दिंडीत ४५ वारकरी आहेत. आळंदीतील परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूरहून थेट आळंदीत जाण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्याऐवजी बुधवारी (दि. ८) दिंडी थेट पुण्यात दाखल होईल आणि तेथूनच पालखी सोहळ्यात सहभागी होईल. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीनुसार निर्णय घेत असल्याचे नमूद केले.

पुण्यात वाढली मुक्कामाची व्यवस्था

आळंदीत न जाता थेट पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढल्याने रविवार पेठ, भवानी पेठ, कसबा पेठ परिसरातील धर्मशाळा, सभागृहे आणि मठांमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली आहे. अनेक वारकरी नातेवाइकांकडे राहत असून, सामाजिक संस्था आणि सेवाभावी मंडळांनीही निवास, भोजन आणि अन्य सुविधांसाठी पुढाकार घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news