Ashadhi Wari Pudhari
पुणे

Ashadhi Wari Palkhi Flower Decoration: माऊली-तुकारामांच्या पालख्यांना फुलांचा राजेशाही साज; रथ सजावटीसाठी पुणे फुलबाजारात मोठी लगबग

गुलाब, ऑर्किड, झेंडू अन् निशिगंधाने सजणार पालखी रथ; मार्केट यार्डातून शेकडो फुलांच्या गड्ड्यांची खरेदी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात फुलांनी सजलेले रथ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. पुण्यात मुक्कामासाठी दाखल झाल्यानंतर प्रस्थान करण्यापूर्वी पालख्यांच्या सजावटीसाठी मार्केट यार्डातील फुलबाजारातून शुक्रवारी (दि. १०) शोभिवंत फुलांच्या शेकडो गड्ड्या सजावटकारांकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून फुले दाखल होतात. पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची सजावट, फुलांच्या पायघड्या तसेच देवाला वाहण्यासाठी फुलांना मागणी राहते. दरवर्षी पालखी तसेच रथांच्या सजावटीसाठी सजावटकार बाजारातून फुलांची खरेदी करतात.

यंदाही सजावटकारांनी एका पालखीसाठी विविध प्रकारची पंधराहून अधिक प्रकारच्या फुलांची खरेदी केली. यामध्ये एका पालखीसाठी जवळपास साडेतीनशेहून अधिक डच गुलाब, आर्किड, कार्नेशियन, साँग ऑफ इंडिया आणि शंभर साध्या गुलाबाच्या गड्ड्या, तर १५० ते २०० किलो स्वरूपात झेंडू, निशिगंध आणि पर्पलची गरजेनुसार खरेदी केली. त्यानंतर विशिष्ट वाहनांतून फुले पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पाठवून देण्यात आल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्याही शहरात दाखल होतात. त्या सर्वांच्या सजावटीसाठी मार्केट यार्डातून फुलांची खरेदी करण्यात येते. बाजारात उपलब्ध असलेल्या फुलांच्या दर्जानुसार सजावटकार फुलांच्या खरेदीस प्राधान्य देतात तसेच शहरातील मंदिरांच्या सजावटीसाठी व देवाला वाहण्यासाठी बाजारात सुट्या फुलांसह शोभिवंत फुलांना अधिक मागणी राहिली. परिणामी, फुलांच्या दरातही दहा टक्क्यांनी वाढ झाली.
सागर भोसले, अडतदार व समन्वयक, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांची सजावटीची सेवा आमच्या हातून घडते. आठ ते दहा जणांच्या मदतीने रथाची सजावट करण्यात येते. एका पालखीसाठी यंदा साडेचारशे शोभिवंत फुलांच्या गड्ड्या, दीडशे किलो खुली फुले खरेदी करण्यात आली. प्रस्थानाच्या रात्रीपासून पालख्यांची सजावट करण्याचे काम सुरू केले. यंदा नवीन पालख्या घडवण्यात आल्याने फुलांची सजावट कमी स्वरूपात करण्यात येणार आहे. पालखीवर शोभिवंत फुलांचा एक पट्टा असेल. तसेच खाली लटकन स्वरूपातील तोरण आहे. प्रत्येक खांबाला गुलाबाची रिंग आहेच; जेणेकरून पालखीवरील कलाकुसर भाविकांच्या नजरेस पडेल.
राहुल ताम्हाणे, सजावटकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT