पुणे: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या दिंड्यांनी शुक्रवारी पुढील पंधरा दिवसांसाठी लागणारा शिधा गुलटेकडी मार्केट यार्डातून मोठ्या प्रमाणात खरेदी केला. त्यामुळे बाजारात चार ते पाच कोटींची उलाढाल झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या शेकडो दिंड्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. या काळात दिंडीचालक आणि सेवेकरी पुढील १५ दिवसांच्या प्रवासासाठी लागणारा किराणा, भाजीपाला, मसाले आणि इतर जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर मार्केट यार्डातून खरेदी करतात.
मागील दोन दिवसांत भुसार विभागात तांदूळ, गहू, ज्वारी, तूरडाळ, हरभरा डाळ, साखर, मीठ, तेल, तिखट, हळद, धणे, जिरे, गरम मसाला, चहा, गूळ, रवा, मैदा आदी वस्तूंना मोठी मागणी राहिली. दरम्यान, अनेक दिंड्या एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याने गोदामांतून मालाची सतत वाहतूक सुरू असल्याचे चित्र भुसार बाजारात दिसून आले. भाजीपाला विभागात कांदा, बटाटा, लसूण, आले, हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, भेंडी आणि इतर भाज्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
शहरातील विविध संघटनांकडून आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा त्यावर जास्त प्रभाव राहिला. तर, दिंडी चालकांनी टिकावू भाज्यांना अधिक पसंती दिली. अनेक दिंड्या दर दोन-तीन दिवसांनी पुढील मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक बाजारातून ताजा भाजीपाला खरेदी करत असल्याचे श्री शारदा गजानन अडते असोसिएशनचे अध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.
आषाढी वारीमुळे दर वर्षी मार्केट यार्डातील भुसार विभागाच्या व्यवहारांना मोठी चालना मिळते. यंदाही राज्यभरातून आलेल्या दिंडीचालकांनी पुढील १५ दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत भुसार विभागात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. वारकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी पुरेसा साठा उपलब्ध ठेवला होता. त्यामुळे कोणत्याही वस्तूची टंचाई भासली नाही.प्रशांत गोते, विभागप्रमुख, गूळ-भुसार
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर यंदा फळे आणि भाजीपाला विभागात मोठी उलाढाल झाली. दिंडीचालकांनी पुढील प्रवासासाठी कांदा, बटाटा, लसूण, आले, टोमॅटो, तसेच टिकाऊ भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. याशिवाय शहरातील विविध संस्थांच्या महाप्रसादाच्या आयोजनामुळेही भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली. वारकऱ्यांना आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी व्यापाऱ्यांनी योग्य नियोजन केले होते. वारीमुळे मार्केट यार्डातील व्यवहारांना दर वर्षी चांगली चालना मिळते.नितीन चौरे, विभागप्रमुख, फळे-भाजीपाला.