पुणे

Ashadhi wari 2023 : माउलींच्या पालखी नगरप्रदक्षिणेने आळंदी गजबजली

अमृता चौगुले

आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सुमारे महिनाभराचा पायी प्रवास, आळंदी ते पंढरपूर व पंढरपूर ते आळंदी परतीचा प्रवास करत आळंदीत दाखल झालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याची गुरुवारी (दि. 13) कामिका एकादशीला पालखी नगरप्रदक्षिणेने सांगता झाली. पालखी सोहळ्यात लाखो वैष्णवांचा मेळा संपूर्ण महिनाभर रममाण झाल्याने तसेच निर्विघ्नपणे सोहळा पार पडल्याने तो विशेष ठरला. आळंदीत नगरप्रदक्षिणा पार पडल्यानंतर वारकर्‍यांनी आपापल्या गावची परतीची वाट धरली आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीची एकादशीला पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. पहाटे दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. गुरुवारी कामिका एकादशीनिमित्त राज्यभरातून दाखल झालेले भाविक आणि पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरवरून आलेले वारकरी यामुळे आळंदी गजबजून गेली होती. दुपारी एकच्या सुमारास माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडली.

महाद्वार, इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्त्यामार्गे पालखी वडगाव चौक येथून हजेरी मारुती मंदिरात विसावली. या वेळी नाईकांच्या वतीने मानाच्या दिंड्या, वीणेकरी, मानकर्‍यांना नारळ, प्रसाद वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या हजेरीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी सायंकाळी मंदिरात दाखल झाली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देऊळवाड्यात संस्थानच्या वतीने मानकर्‍यांना नारळ, प्रसाद वाटप करण्यात आले. वारकर्‍यांनी सायंकाळी आपापल्या गावची परतीची वाट धरली. त्यामुळे बसस्थानक, खासगी प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT