पुणे

Ashadhi Wari 2023 : तुकोबारायांच्या स्वागतासाठी अंथुर्णेकर सज्ज

अमृता चौगुले

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा

भेटी लागे जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥
पौर्णिमेचा चन्द्रमा चकोरा जीवन ।
तैसे माझे मन वाट पाही ॥

संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे अंथुर्णेकरांना संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाची घाई झाली आहे. पालखी सोहळा देहूतून निघाल्यापासून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात वैष्णवांच्या सुविधांची लगबग सुरू आहे.
गावकर्‍यांनी वैष्णवांच्या मुक्कामासाठी संपूर्ण परिसराची स्वच्छता, ठिकठिकाणी आंघोळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पालखीचे आगमन होणार असून, गावकरी गावाच्या हद्दीवर जाऊन स्वागत करणार आहेत.

गावच्या मुख्य चौकापासून पालखीतळापर्यंत पायघड्या टाकणार आहेत. मुख्य रस्त्यावर जागोजागी स्वागत कमानी उभारल्या आहेत. पालखीतळावर तुकोबांच्या पादुका दर्शनासाठी गर्दी होत असल्याने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनबारी केली आहे. तसेच चोख बंदोबस्तही असणार आहे. तळावर आपत्कालीन कक्ष, आरोग्य केंद्र, पोलिस चौकी उभारली आहे. गावामध्ये लाखो वैष्णवांचा मेळा येणार असल्याने धार्मिक वातावरण बनले आहे.

सोमवारी (दि.19) कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलोरी यांनी पालखीतळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या वेळी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे, स.पो.नि.विक्रम साळुंखे, सरपंच लालासाहेब खरात, राहुल साबळे, गुलाब म्हस्के,पिंटू साबळे, ग्रामसेवक भोसले,बी. एल.भागवत, तलाठी मिलिंद हगारे, खंडू जाधव आदी उपस्थित होते.

पाळण्यांचे क्षमता प्रमाणपत्र घ्या

पालखीनिमित्त आलेल्या फिरत्या पाळण्यांमुळे अपघात होत असल्याने संबंधित पाळणाचालकाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने क्षमता प्रमाणपत्र घ्यावेअन्यथा निर्बंध घाला, असे आदेश पोलिस महानिरीक्षक फुलोरी यांनी पोलिस अधिकारी भोईटे यांना दिले आहेत. त्यामुळे पाळणा व्यावसायिकांवर टांगती तलवार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT