सोलापूर : लालपरीची कोटींची उड्डाणे | पुढारी

सोलापूर : लालपरीची कोटींची उड्डाणे

सोलापूर; अंबादास पोळ :  गावकर्‍यांची जीवनवाहिनी एस. टी. बस आता राज्यभरात तुफान वेगात धावू लागली आहे. कोरोना व एस.टी. कर्मचारी संपामुळे तब्बल 4 हजार कोटी रुपये इतके तोट्यात आलेले एस. टी. महामंडळ आता अवघ्या काही महिन्यांत तोटा 10 कोटींवर आणण्यात यशस्वी झाले आहे. जून महिन्यातील आषाढी वारीनिमित्त राज्य एस. टी. महामंडळाकडून 5 हजार बसेस सोडण्यात येणार आहेत. यातून उत्पन्न वाढून पुढीलकाळात एस.टी.नफ्यात असेल, असा विश्वास महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

कोरोना पार्श्वभूमी व त्यानंतर एस. टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे एस.टी. महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. सलग पाच महिने संप सुरू असल्याने बसगाड्या थांबून होत्या. परिणामी टायर खराब झाले तसेच गाडीचे इंजन, ब्लॉकपिस्टन, चेसी यामध्ये बिघाड झाला होता. दरम्यानच्या कालावधीत संपाचा फटका एस.टी.च्या उत्पन्नावर दिसून आला. मागील तीन वर्षांत सुमारे 4 हजार कोटींचा तोटा राज्य एस.टी. महामंडळाला सोसावा लागत होता. मात्र, मे 2023 च्या महामंडळाच्या अहवालानुसार हा तोटा अवघ्या 10 कोटींवर येऊन थांबला आहे. महाराष्ट्रातील 31 विभागांतील वरिष्ठ आधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांनी तोटा कमी करण्याचे साध्य करून दाखवले आहे.

एस.टी.च्या 31 विभागांपैकी 18 विभागांतून जोरदार कामगिरी दिसून आली. यात बीड विभाग सर्वात जास्त उत्पन्न देणारा विभाग म्हणून पुढे आला, तर कोल्हापूर विभागाकडून सर्वात कमी उत्पन्न मिळाले. काही कालावधीत एस.टी.महामंडळ उत्पन्नाच्या बाबतीत पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. त्यामुळे महामंडळाने आवश्यक असलेल्या ठिकाणी जुन्या गाड्यांचे नव्यात रुपांतर करणे गरजेचे झाले आहे.

कोरोना आणि एस.टी. कर्मचारी संपामुळे एस.टी.ला प्रचंड आर्थिक फटका बसला होता. गेल्या काही महिन्यांपासून हा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नवीन गाड्या रस्त्यावर आणणे, ‘महिला सन्मान’ योजनेसह विविध योजनांमुळे एस.टी.चा प्रवासीवर्ग वाढू लागला आहे. यामुळे एस.टी.च्या उत्पन्नवाढीला मदत झाली.
– शेखर चन्ने महामंडळ उपाध्यक्ष, एस.टी. महामंडळ

Back to top button