पुणे

पुणे : आशा वर्कर्सचे व गट प्रवर्तकांचे मानधन रखडले

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागातील आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांपासूनचे मानधन रखडले आहे. तत्काळ मानधन द्यावे, अशी मागणी राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. पुणे जिल्ह्यात सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आहेत.

त्यांच्याकडून आरोग्य सेवेसंबंधी कामे करून घेतले जातात. त्यांना मानधन दिले जाते. तसेच लसीकरणासाठी प्रत्येक दिवशी 200 रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली, परंतु अद्याप नियमित आणि वाढीव मानधनही देण्यात आलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रात आशा वर्करना मदत करावी लागते. त्याचाही मोबदला देण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

कोरोना संदर्भातील कामे आणि आरोग्यासंदर्भातील अनेक कामे करावी लागत आहेत. मात्र, मानधन देण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव श्रीमंत घोडके यांनी केला आहे.

जानेवारी अखेरपर्यंतचे मानधन दोन दिवसांत जमा होणार

आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांचे मानधन देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार साडेतीन कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला असून, जानेवारी अखेरपर्यंतचे मानधन दोन दिवसांत बँक खात्यात जमा होईल. कोविड लसीकरणाचे मानधन सप्टेंबर अखेरपर्यंतचे जमा केले आहे. उर्वरित मानधन शासनाकडून आदेश आल्यानंतर जमा केले जाईल.

– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT