नारायणगाव: आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील अडीच वर्षांच्या आर्या योगेश भालेकर हिने विषारी नागाच्या दंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत येत जीवनावर पुन्हा हक्क मिळविला. कुटुंबीयांची तत्परता आणि नारायणगावच्या विघ्नहर नर्सिंग होममधील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे हा थरारक प्रसंग सुखरूपरीत्या टळला.
शुक्रवारी (दि. १९) दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास आर्या आपल्या वडिलांसोबत झोपलेली असताना अचानक रडू लागली. पाहणी केली असता जवळच विषारी नाग आढळून आला आणि नागाने तिच्या उजव्या हाताला दंश केल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबीयांनी तिला तातडीने नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होममध्ये दाखल केले. सर्पदंशानंतर अवघ्या ४५ मिनिटांत ती रुग्णालयात पोहचली; मात्र तोपर्यंत तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती.
रुग्णालयात दाखल होताच ती कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट अवस्थेत होती. हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास आणि नाडी पूर्णपणे बंद पडली होती. अशा परिस्थितीत डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी तातडीने सीपीआर सुरू करून तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. पुढील दीड तासात तिला तीनवेळा हृदयविकाराचे झटके आले; मात्र प्रत्येक वेळी डॉक्टरांनी तिचे हृदय पुन्हा सुरू करण्यात यश मिळविले. उपचारादरम्यान ३० अँटी-स्नेक व्हेनम इंजेक्शन्स देण्यात आली.
डॉ. ऋचा मते, डॉ. अजय मते, डॉ. योगेश पाटील तसेच विघ्नहर नर्सिंग होममधील परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे सायंकाळपर्यंत तिच्यात सुधारणा दिसू लागली. अवघ्या २४ तासांत तिला पूर्ण शुद्ध आली आणि यशस्वीरीत्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सर्पदंश झाल्यानंतर करावयाच्या महत्त्वाच्या बाबी
सर्पदंशानंतर वेळ न दवडता तातडीने रुग्णालयात पोहचणे, हेच जीव वाचविण्याचे सर्वांत प्रभावी साधन आहे.
योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात अँटी-स्नेक व्हेनम, कृत्रिम श्वसन व अतिदक्षता उपचार दिल्यास अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णही पूर्णपणे बरे होऊ शकतात.
अनुभवी डॉक्टरांचे नेतृत्व, वैद्यकीय पथकाचे समन्वित प्रयत्न आणि शेवटच्या क्षणापर्यंत न हार मानण्याची जिद्द, यामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते.