पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुमार गंधर्वजींसारखे कलावंत युगपुरुष असतात. कुमारजींनी आपल्या गाण्यातून सामान्यांसह जाणकार श्रोत्यांनाही खूप आनंद दिला. शब्दांचे खास कुमारगंधर्वीय उच्चार, रागरूपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लोकसंगीताचा अनोखा स्पर्श, प्रत्येक प्रस्तुतीमागे विचार-अभ्यास असल्यामुळे त्यांच्या गाण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवायचा. त्यांच्या प्रस्तुतीकरणातील चैतन्य सर्वांना आकर्षित करायचे, अशी भावना ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देवासस्थित (मध्य प्रदेश) कुमार गंधर्व प्रतिष्ठानतर्फे आयोजिलेल्या मकालजयीफ कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. उद्योजक संजय किर्लोस्कर, कुमारजींच्या कन्या आणि गायिका कलापिनी कोमकली, नातू गायक भुवनेश कोमकली उपस्थित होते. पंडित कुमार गंधर्व यांचा तानपुरा कलापिनी कोमकली आणि भुवनेश कोमकली यांनी राजा दिनकर केळकर संग्रहालयाकडे सुपूर्द केला.
उद्घाटनानंतर मधुप मुद्गल यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी विविध रचना सादर करीत मने जिंकली. यानंतर ज्येष्ठ व्हायोलीनवादक डॉ. एन. राजम यांच्यासह त्यांच्या नाती नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांनी केलेल्या व्हायोलीनच्या सुरांनी एक मंतरलेली सायंकाळ रसिकांनी अनुभवली. त्यांनी मैफलीची सुरुवात राग जयजयवंतीने केली. मैफलीची सांगता मजानकी नाथ सहाय करेफ या भजनाने केली. डॉ. एन. राजम यांनी कुमार गंधर्व यांच्या सोबतच्या आठवणीने उजाळा दिला. पहिल्या दिवसाचा समारोप गायिका अश्विनी भिडे – देशपांडे यांच्या सुरेल गायनाने झाला.
कुमारजींचे गाणे मला प्रत्यक्ष ऐकायला मिळाले, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. त्यांच्यासारख्या कलाकारांनी माझे सांगीतिक विचार श्रीमंत केले. संगीताकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकविले, नादाच्या अमर्याद विश्वाचे दर्शन घडविले, माझे भावविश्व समृद्ध केले. कुमारजींनी केलेले राग-बंदिशी यात खास कुमारगंधर्वी खुणा आहेत आणि त्या तशाच जपायला हव्यात.
– डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका
हेही वाचा